सचिन जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुका दुसऱ्या दिवशीही जल्लोषात सुरु होत्या. पुण्यात तब्बल २८ तासांनंतर गणेश विसर्जन मिरवणुका संपल्या. मंगळवारी मानाच्या ५ गणपतींचं पर्यावरण पुरक पद्धतीने विसर्जन झालं. तर दगडूशेठ गणपतीचंही दिमाखात विसर्जन झालं. त्यानंतर आज दुपारपर्यंत इतर काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. पुण्यात यंदा २८ तास ५ मिनिटं गणेश विसर्जन मिरवणुका चालल्याने नागरिकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
मंगळवारी संध्याकाळी मानाचे पाच गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन ९ वाजता संपन्न झाले. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूक सुरू होती. अनंत चतुर्थदशीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका संपल्या आहेत. अलका चौकात सर्वात शेवटी भवानी पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाचा शेवटचा गणपती पोहोचला. २८ तास ५ मिनिटांनी शेवटचा हा गणपती अलका चौकात पोहोचला होता.
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक पार पडल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले की, 'पुणे शहरात गणपती विसर्जन मिरवणूक ३ वाजता संपल्या आहेत. अंदाजे २८ तास मिरवणूक शांततेत पार पाडली. पोलिसांनी व्यवस्थितरित्या मिरवणूक पार पडली. मोठा जनसमुदाय या मिरवणुकीत सहभागी झाला होता. या मिरवणुकीत पुणेकरांचे आणि बाहेरून आलेल्या सर्व गणेश भक्तांचे आभार'.
'लेझरबाबत बंदी घातली होती. ज्या मंडळांनी लेझर वापरली असेल, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आवाजाची मर्यादा ओलांडण्याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मोबाईल चोरी घटना घडल्या आहेत. त्याबाबत कारवाई करून चोऱ्या उघडकीस आणू. महिला सुरक्षाबाबत काम केलं, त्यात काही घटना घडल्या असतील, तर त्यावरही कारवाई करू, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले.
2016 : 28 तास 30 मिनिटे
2017 : 28 तास 05 मिनिटे
2018 : 27 तास 15 मिनिटे
2019 : 24 तास
2020 आणि 2021 : कोविड महामारीमुळे मिरवणूक निघाली नाही
2022 : 31 तास
2023 : 28 तास 25 मिनिटे
दरम्यान, आज अलका चौकात पोलिसांनी ऐकत नसलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून चोप देखील दिला. अलका चौकाच्या पुढे एक सार्वजनिक गणेश मंडळ हे एका जागीच थांबून डीजे वाजवत होतं. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या मंडळाची मोठी कोंडी झाली. पोलिसांनी वारंवार सांगून देखील पुढे सरकत नसल्याने पोलिसांना या मंडळाच्या कार्यकर्त्यांना चोप द्यावा लागला. या ठिकाणी काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी येत वाद थांबवत या गणेश मंडळाला पुढे सरकवले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.