

पुण्यात नवरा- बायकोच्या वादातून गोळीबार
कसबा पेठमध्ये कौटुंबिक वादानंतर नवऱ्याने स्वतःवर झाडली गोळी
पुण्यातील गोळीबाराच्या घटनेत तरुणाच्या हाताला गोळी लागली
फरासखाना पोलिसांकडून तपास सुरू
पुण्यात गोळीबाराची थरारक घटना घडली. नवरा -बायकोच्या वादातून हा गोळीबार झाला. पुण्यातील कसबा पेठ परिसरात ही धक्कादायक घटना घडली. फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भैरवनाथ मंदिराजवळ नवरा-बायकोमधील कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर हा गोळीबार झाला. या घटनेत तरुणाच्या उजव्या हाताला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरा-बायकोमध्ये झालेला वाद इतका तीव्र झाला की दोघांनीही एकमेकांना गोळी मारण्याबाबत बोलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. नवऱ्याने बायकोला कथितरित्या 'स्वतःला गोळी मार' असे सांगितले. तर नवऱ्याने बायकोला 'मलाच गोळी मार' असे म्हटल्याची माहिती मिळत आहे. दोघांच्या या वादात बंदुकीतून गोळी सुटली आणि नवरा जखमी झाला.
या भांडणात संतप्त झालेल्या नवऱ्याने शेवटी स्वत:वरच गोळी झाडून घेतली आणि त्याच्या उजव्या हाताला गोळी लागली. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर तरुणाच्या बायकोनेही रुग्णालयात धाव घेतली. या गोळीबाराच्या घटनेमुळे कसबा पेठ परिसर हादरला. नेमकं कोणत्या कारणावरून या दोघांमध्ये वाद झाला होता याचे कारण अद्याप समोर आले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांना रक्ताचे डाग, एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून शस्त्रासह इतर पुरावे ताब्यात घेतले आहेत. नवरा-बायकोमधील वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला?, गोळी कोणी झाडली?, शस्त्र कोणाच्या ताब्यात होते? आणि गोळीबार नेमका कसा झाला?, याचा फरासखाना पोलिस तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.