

पुणे महापालिका निवडणुकीआधी प्रभाग ९ मध्ये राजकीय वातावरण तापले
‘पेढ्यात विष’ विधानामुळे वाद अधिक चिघळला
भाजपकडून राष्ट्रवादी उमेदवारांवर थेट आरोप
अजित पवारांच्या सभेसाठी पैसे वाटल्याचा दावा केला
पुणे महापालिकेच्या निवडणुकीला अवघे ८ दिवस उरल्यामुळे विविध प्रभागात सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय. असं असतानाच पुण्यातील प्रभाग ९ मध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये. भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणारे अमोल बालवडकर यांनी थेट केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. आपल्या नेत्यांवर होणारी टीकेला उत्तर देण्यासाठी आता प्रभाग ९ मधील भाजपाचे उमेदवार पुढे आले आहेत.
प्रभाग ९ मधील भाजपच्या दोन उमेदवारांकडून आज एकत्रित पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजप चे लहू बालवडकर आणि गणेश कळमकर उपस्थित होते. यावेळी अमोल बालवडकर यांनी भाजपवर केलेल्या आरोपांचे खंडन करण्यात आले.
भाजप उमेदवार लहू बालवडकर म्हणाले, "पुण्यातील प्रभाग ९ मध्ये भाजपकडून ४७ जणं इच्छुक होते त्यातून ४ जणांना उमेदवारी मिळणार होती. उमेदवारी देण्याचा निर्णय हा पक्षाचा असतो. प्रभाग ९ मधील अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही. प्रत्येक पक्षात शेवटच्या क्षणी काही बदल होतात तेच बदल भाजप मध्ये या ठिकाणी झाले. भाजप पक्षात कुठली ही आणि कोणाचीही मनमानी चालत नाही. आम्ही पक्ष श्रेष्टींचा आदेश हा अंतिम आदेश मानतो."
अमोल बालवडकर यांच्यावर आरोप करताना लहू बालवडकर म्हणाले, "मी सांगेल त्याच जागा द्याव्या अशी त्यांची (अमोल बालवडकर) मागणी होती. स्टँडिंग कमिटी ची मागणी त्यांच्याकडून (अमोल बालवडकर) होत होती. १.५ वर्ष तुम्ही कुठे होते? पक्षाचे कुठल्या ही कार्यक्रमात ते दिसले नाहीत. जी कामं त्यांनी केली त्यांनी ती दाखवावी."
अजित पवारांच्या सभेत अमोल बालवडकर यांनी भाजपवर निशाणा साधत टीका केली होती. "दीड वर्षांपूर्वी मला पेढा चारला होता. आज कळलं मला की त्यात विष होतं," अशी टीका त्यांनी केली होती. आता या टीकेला भाजपकडून प्रभाग ९ मधील त्यांचे प्रतिस्पर्धी गणेश कळमकर यांनी उत्तर दिलं आहे. कळमकर म्हणाले, "अमोल बालवडकर यांना पुणे महापालिकेत "स्पीड" ने पदे हवी होती. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा ते सुप्रिया सुळे यांच्या गाडीत होते अशा बातम्या समोर आल्या होत्या. तसेच संजय राऊत यांना भेटण्यासाठी ते मातोश्री वर सुद्धा ते गेले होते. जर दीड वर्षापूर्वी त्यांना पेढा चारला होता आणि त्यात विष होतं तर त्याचा प्रभाव तेव्हाच त्यांना दिसला असता एवढा वेळ लागला नसता. मीच ३ नगरसेवक निवडून आणले असं ते नेहमी सांगत होते. कोणी मालकी दाखवायला गेलं की भाजप पक्षाला काही निर्णय घ्यावा लागतो."
तीन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची पुण्यातील पहिली जाहीर प्रचार सभा बाणेर सूस या भागात झाली. मात्र या सभेला गर्दी व्हावी म्हणून पैस वाटले गेल्याचा आरोप भाजप ने केला आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार अमोल बालवडकर, बाबुराव चांदेरे, गायत्री मेढे यांच्या प्रचारार्थ अजित पवारांची सभा झाली. या सभेपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बाबुराव चांदेरे यांच्या मुलावर मतदारांना प्रभावित केल्याप्रकरणी तसेच आचारसंहितेचे भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आता याबाबत भाजप ने थेट या सभेसाठी पैसे वाटले गेल्याचा आरोप केला आहे. प्रभाग ९ मधील भाजप चे उमेदवार लहू बालवडकर यांनी हे आरोप केले आहेत. "प्रभाग ९ मध्ये "दादांच्या" सभेसाठी पैसे वाटले गेले होते, सभेला गर्दी व्हावी म्हणून पैसे वाटले गेले. आम्ही पोलिस ठाण्यात गेल्यावर तिथे तक्रार केली आणि गुन्हा दाखल झाला. अजित पवारांच्या सभेला गर्दी पाहिजे म्हणून पैसे वाटायची गरज कशाला होती," असा प्रश्न सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.