

पुण्यात एसीबीने मोठी कारवाई
पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना पकडलं
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला ३५ हजारांची लाच घेताना पकडलं
गाडी जप्त न करण्यासाठी आणि तपासात मदत करण्यासाठी १ लाखांची मागणी केली होती
पुण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली. लाच घेताना पोलिस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पौड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला लाच घेताना पकडण्यात आले. एसीबीच्या या कारवाईमुळे पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. एसीबीने या पोलिस अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पौडचे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सचिन बाळासाहेब शिंदे यांना ३५ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी मुळशी येथे सापळा रचून ही कारवाई केली.
पौड पोलिस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सचिन शिंदे यांनी तक्रारदाराला एका गुन्ह्यात गाडी जप्त न करण्यासाठी आणि तपासात सहकार्य करण्यासाठी १ लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर यातील ३५ हजार रुपयांची लाच घेताना शिंदे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. रात्री उशिरा सचिन शिंदे यांच्याविरुद्ध मुळशीतील पौड पोलिस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक शैलजा शिंदे यांच्याकडून सुरू आहे.
दरम्यान, बीडमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी मोठी कारवाई केली होती. शेतकऱ्याकडून लाच घेताना तहसीलदाराला एसीबीने रंगेहाथ पकडलं होतं. बीडच्या परळीतील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली होती. तहसीलदाराने शेतकऱ्याकडून ५० हजारांची लाच मागितली होती. यामधील २० हजार रुपये घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदाराकडून सोलंसी (ऐपतीचे) प्रमाणपत्र देण्यासाठी हे पैसे घेण्यात आले होते. या कारवाईमुळे बीडमध्ये खळबळ उडाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.