सागर आव्हाड, साम टीव्ही
पुणे: विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांतच एका 18 वर्षीय तरुणीचा छळाला कंटाळून आणि संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. श्रुती असे या तरुणीचे नाव असून सासरच्या मंडळीनी जेवणात विष घालून तिची हत्या केल्याचा खळबळजनक आरोप तिच्या पालकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रुती आणि बुद्धभूषणचे प्रेमसंबंध होते. या संबधातून 28 मार्च 2024 रोजी त्यांचा विवाह झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे लग्नाच्या वेळी श्रुती ही अवघ्या 16 वर्षांची होती. बदनामीच्या भीतीने तिच्या पालकांनी हे लग्न लावून दिलं होतं. मात्र लग्नानंतर काही काळातच तिला हुंड्यासाठी आणि इतर कारणांवरून सासरच्यांकडून मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात झाली.
श्रुतीच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, तिचा पती बुद्धभूषण, सासू, सासरे आणि दीर यांच्याकडून तिला सतत मारहाण केली जात असे. जेव्हा तिने या त्रासाबद्दल पोलिसांत तक्रार करण्याची भाषा केली. तेव्हा तुझे व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी सासरच्यांकडून देण्यात आली होती. या भीतीपोटी ती हा नरकयातना देणारा छळ सहन करत होती.
4 मे रोजी 2026 रोजी श्रुतीला अचानक उलट्या आणि जुलाबाचा प्रचंड त्रास सुरू झाला. त्यानंतर तिला तातडीने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 5 मे 2026 ला अखेर तिची प्राणज्योत मालवली. श्रुतीच्या आई वडिलांनी असा आरोप केला आहे की, ही नैसर्गिक आजारी पडल्याची घटना नसून तिला जेवणातून विष देण्यात आले आहे.
या घटनेमुळे कोथरूड परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. आमच्या मुलीचा छळ करून तिचा जीव घेण्यात आला आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी मृत श्रुतीच्या नातेवाईकांनी केली आहे. आता या प्रकरणी पुणे पोलीस काय पाऊल उचलतात आणि पोस्टमार्टम रिपोर्टमधून काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.