

महापालिका निवडणुकीत निवडणूक आयोगाचा गंभीर प्रशासकीय गोंधळ
जयश्री भोंडवे यांचा अधिकृत एबी फॉर्म छाननीदरम्यान गहाळ
अपक्ष उमेदवार ठरवल्यानंतर थेट उच्च न्यायालयात धाव
राज्यात महापालिका निवडणुकीचा रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा एका अजब कारभार समोर आलाय. एका उमदेवाराचा उमदेवारी अर्ज गहाळ झाल्याचं समोर आलंय. या गंभीर प्रशासकीय चुकीचा फटका थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला बसलाय. अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री भोंडवे यांनी पिंपरी चिंचवडमधील प्रभाग १६ मधून ओबीसी महिला आरक्षणांतर्गत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्जासोबत त्यांनी पक्षाचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ही जोडला.
मात्र छाननी प्रक्रियेदरम्यान हा एबी फॉर्म गहाळ झाल्याचं म्हणत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जयश्री भोंडवे यांना अपक्ष उमेदवार ठरवले. या निर्णयाविरोधात जयश्री भोंडवे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात त्यांनी अर्ज दाखल करताना एबी फॉर्म सादर केल्याचे सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओग्राफी तसेच अन्य तांत्रिक पुरावे दिले. सुरुवातीला या पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्याने न्यायालयाने निवडणूक आयोगाला स्वतंत्र सुनावणी घेऊन सर्व बाबींची तपासणी करण्याचे आदेश दिलेत.
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने कठोर पाऊल उचलत अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. ब प्रभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी हणमंत पाटील यांच्याकडील कामकाज काढून घेण्यात आले आहे. आता त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांची नियुक्ती करण्यात आलीय. एबी फॉर्म गहाळ होण्याच्या प्रकारामुळे प्रशासनावर टीकेची झोड उठलीय. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार चिन्ह वाटपाच्या दिवशीच तातडीची सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान जयश्री भोंडवे यांनी एबी फॉर्म वेळेत सादर केला होता, हे स्पष्ट झालं. सादर करण्यात आलेले पुरावे आणि तांत्रिक नोंदी तपासल्यानंतर आयुक्त हर्डीकर यांनी हा एबी फॉर्म ग्राह्य धरला. त्यामुळे अर्ज छाननीच्या अंतिम यादीत अपक्ष ठरलेल्या जयश्री भोंडवे यांना चिन्ह वाटपाच्या यादीत राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ चिन्ह देण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.