मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नगरसेवक–महापौरांबाबत परखड वक्तव्य
महापालिकांमधील भ्रष्टाचार आणि अनधिकृत बांधकामांवर टीका
शिंदे–फडणवीस ‘ब्रँड’ असल्याचा दावा
ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला
'ज्याने मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक, महापाप केलं तो महापौर', असे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 'आपले ठाणे आपला देवाभाऊ' या कार्यक्रमात अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांनी राज्यातील प्रकल्प, योजना, सुविधा, शिक्षण, रोजगार, निवडणूक या विषयांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील सडकून टीका केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील अनधिकृत बांधकांमांवर प्रतिक्रिया देत असताना सांगितले की, 'मी महापौर होतो हे फार कठीण काम आहे. ज्यांनी मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक होतो आणि ज्याने महापाप केले तो महापौर होतो. सगळे नाही पण अनेक नगरसेवक मालक असल्यासारखं काम करतात. आपल्या भागात आपण मालक आहोत ही भावना घातक आहे. आपल्याला कारभारात पारदर्शकता आणणे महत्वाचे आहे. कोणाला जबाबदार धरायचे हे सुद्धा कायद्यात आहे तरी पण अनधिकृत बांधकाम होत आहे.
तसंच, 'जवळ जवळ सर्वच महापालिका आपल्या मालमत्तेच्या नोंद करत आहेत. अनेक वेळा महापालिका मध्ये बांधकामाच्या परवानग्या मिळवणे हे सुद्धा कठीण आहे. आता आपण नवीन मॉडेल तयार करत आहोत. AI चा वापर करून २४ तासांत कधीही तुमचा प्लान अपलोड करू शकाल. १० ठिकाणी जाण्याची गरज नाही. AI ने पारदर्शकता आणण्या करता अनेक टूल उपलब्ध केले आहे.', असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे-फडणवीस ब्रँड आहेत असे म्हणत ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, 'स्वत:चे अधिक नगरसेवक विजयी करण्याच्या संकुचित विचारापेक्षा मुंबई महानगर प्रदेशात जेथे जेथे शक्य असेल तेथे स्थिर आणि सक्षम युती देण्याचे काम केले. या महाराष्ट्रात एकच ब्रँड होते हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. मी आणि एकनाथ शिंदे आम्ही एवढे मजबूत आहोत कोणीही ब्रँड म्हणून उभे राहिले आमच्या समोर तर त्यांचा बँड बजावू.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.