

मुंबईमध्ये मराठी- अमराठीचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. मराठी माणसांची गळचेपी होत असल्याचा आणि मराठी माणसाला मुंबईपासून दूर केलं जात असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. याच मराठीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी देखील सरकारला धारेवर धरले आहे. मुंबई आणि मराठीच्या मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. 'मुंबईमध्ये मराठी माणसाची गळचेपी कुणीही करू शकत नाही आणि ती आम्ही होऊन देणार नाही.', असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले. सकाळ माध्यम समूहाला मुख्यमंत्र्यांनी आज विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले.
महायुती सरकारच्या काळातच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याच मराठी भाषेवर मुंबईत अन्याय होत असल्याचा आरोप केला जात आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, 'मुंबई कॉस्मोपॉलिटन शहर झाले आहे. आजही इथे सगळ्यात जास्त लोकं मराठी बोलणारेच आहेत. देशभरातील लोकं येथे आली आहेत. पण मुंबई मराठी आहे आणि ती जन्मभर मराठीच राहील. मुंबईचे मराठीपण कुणीच घालवू शकत नाही. आपल्या रीडेव्हलपमेंटच्या पॉलिसिज अशा होत्या की ज्या पॉलिसिजनी मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर जायला मजबूर केलं. पण आता आपण ज्या पॉलिसिज आणलेल्या आहेत त्यामुळे मराठी माणसाला मुंबईमध्येच घर मिळत आहे. मोठं घर मिळतय तो इथेच पुनर्वसित होत आहे.'
मुंबईतील मराठी- अमराठी वादावर मुख्यमंत्री म्हणाले की, 'मुंबईच्या संस्कृतीत सर्वजण गुण्यागोविंदाने नांदणारे आहेत. मुंबईत गणेशोत्सव आख्खी मुंबई साजरी करते. मुंबईत गोंविदा पथक असून त्या गोविंदा पथकामध्ये सर्वजण दिसून येतात. आपली मराठी लोकसंख्या इथून कमी होण्याचं काही कारण नाहीये. आता एक खरं आहे की कधी कधी काही कॉन्फ्लिक्ट तयार होतात. मराठी हिंदी तयार होतात. पूर्वी मराठी आणि साऊथ इंडियन कॉन्फ्लिक्ट व्हायचे पण हे जेवढ्या मोठ्या प्रमाणात दाखवले जातात.'
मुख्यमंत्र्यांनी यावेळी हिंदी भाषा सगळ्यांनीच शिकली पाहिजे असे मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, 'आपली अस्मिता जपली गेली पाहिजे. आपले मराठीपण, आपली मराठी भाषा आपण जपली पाहिजे. जे जपले जात नाही ते क्षीण होत जाते. आपली मराठी मातृभाषा आहे. आणखी एक भाषा आपण शिकलो तर आपले व्यक्तिमत्व मोठे होते. देशभरामध्ये आपले सॉफ्टवेअर इंजिनियर जातात. जगभरामध्ये आपले सॉफ्टवेर इंजिनियर जातात. त्यामुळे आता हे सॉफ्टवेर इंजिनियर्सला जर इंग्रजी भाषा आली तर त्यांना सगळीकडे जाता येतं. त्यांना वेगवेगळ्या भाषा आल्या तर त्या- त्या राज्यामध्ये गेल्यानंतर त्यांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे एक भाषा अजून शिकणं गरेजेचे आहे.'
तसंच, 'आपण जर बघितलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदी भाषेच्या संदर्भात आग्रह धरला होता. हिंदी भाषा शिकली पाहिजे सगळ्यांनी हे सांगितलं होतं. तुम्ही भारतीय भाषेला विरोध करता आणि इंग्रजीला पायघड्या घालता. आपल्या भाषेला असा विरोध करायचा की पाकिस्तानची भाषा आहे.', असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी हिंदीला विरोध करत राजकारण करणाऱ्यांना खडेबोल सुनावले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.