वर्ष श्राद्धाला जाताना काळाचा घाला! कसारा घाटात ट्रक कंटेनर दुचाकीवर उलटला; कंटेनरखाली दबून पती-पत्नीचा मृत्यू

Kasara Ghat Accident : नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात भीषण अपघात घडलाय. कंटेनर एका दुचाकीवर उलटल्यानं एका दाम्पत्याचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेने घाटी शहरात हळहळ व्यक्त केली जातेय.
New Kasara Ghat accident couple dies under overturned container
New Kasara Ghat accident couple dies under overturned containersaam tv
Published On: 
Summary
  • नवीन कसारा घाटात कंटेनरखाली दबून दाम्पत्याचा मृत्यू

  • नाशिक मुंबई महामार्गावर कंटेनर पलटी होऊन भीषण अपघात

  • कसारा घाटात अपघाताच्या दुसऱ्या दिवशी दाम्पत्याचे मृतदेह आढळले

फैय्याज शेख, साम प्रतिनिधी

नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात भीषण अपघात घडलाय. एका दुचाकीवर कंटेनर उलटून पडल्यानं दाम्पत्याचा मृत्यू झालाय. जालिंदर भगत आणि अनुसया भगत अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. ते घोटी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळालीय. धक्कादायक बाब म्हणजे कंटेनरखाली दुचाकी आणि दाम्पत्य दबले आहेत हे कोणाच्याच लक्षात आलेच नाही. दुसऱ्या दिवशी अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू असताना या घटनेचा उलगडा झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी नाशिकहून मुंबईच्या दिशेने कंटेनर क्रमांक NL 01 N 0688 जात होता. सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास नवीन कसारा घाटातील नागमोडी वळणावर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर रस्त्यावरच उलटला. अपघातानंतर कंटेनरखाली दुचाकी दबल्याची माहिती कोणालाही मिळाली नव्हती. त्यामुळे सुरुवातीला या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याची नोंद कसारा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र दुसऱ्या दिवशी कंटेनर हटवताना धक्कादायक प्रकार उघड झाला.

अपघाताच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा उलटलेला कंटेनर हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं, त्यावेळी एक दुचाकी दबल्याची बाब उघडकीस आली. कंटेनर बाजुला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकातील सदस्य लक्ष्मण वाघ, जसविंदर सिंग, दत्ता वाताडे आणि बाळू मांगे हे क्रेनसह घटनास्थळी दाखल झाले.

कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू असताना त्याखालून उग्र वास येऊ लागला. त्यामुळे पथकातील सदस्यांना कोणीतरी खाली दबल्याचा संशय आला. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथक, कसारा पोलीस आणि महामार्ग पोलीस घोटी केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या मदतीने कंटेनर बाजूला केल्यानंतर त्याखाली दबलेली दुचाकी आणि दाम्पत्याचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर दोन्ही मृतदेह रुग्णवाहिकेतून कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

कार्यक्रमाला निघालेले दाम्पत्य घरी परतलेच नाही

जालिंदर भगत आणि अनुसया भगत हे दाम्पत्य घोटी येथील रहिवासी होते. ते कसारा येथे एका कार्यक्रमासाठी दुचाकीवरून निघाले होते. मात्र, ते कार्यक्रमस्थळी पोहोचले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी रात्रीपासून त्यांचा शोध सुरू केला होता. शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. दरम्यान, दुसऱ्या दिवशी कसारा घाटातील अपघातात दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com