वर्सोवात ब्रँडेड दूध पिशव्यांचा गैरवापर करून भेसळ सुरू होती
९५८ लिटर अस्वच्छ पाणी मिसळलेले दूध जप्त करून नष्ट
७ आरोपींवर BNS व अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
बनावट पिशव्या व पुरवठा साखळीचा पुढील तपास सुरू
संजय गडदे, मुंबई
वर्सोवा परिसरात नामांकित दूध कंपन्यांच्या पिशव्यांचा गैरवापर करून दुधात अस्वच्छ पाणी मिसळून विक्री करणाऱ्या टोळीचा मोठा पर्दाफाश झाला आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि वर्सोवा पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत ९५८ लिटर भेसळयुक्त दूध जप्त करून नष्ट करण्यात आले असून ७ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्सोवा पोलीस ठाण्यात गु.र. क्रमांक 1105/2025 अन्वये BNS कलम 274, 345, 347(1), 3(5) तसेच अन्नसुरक्षा व मानदे कायदा 2006 व नियम 2011 मधील कलम 26, 27, 31, 59, 63 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना 31 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11.28 वाजता घडली आहे.
दिनांक 31/12/2025 रोजी सकाळी 5.45 ते दुपारी 3.30 या कालावधीत अंधेरी पश्चिमेतील नवजीतनगर रहिवासी सेवा संघ, संत लुईस मार्ग, चार बंगला, हनुमान मंदिर परिसरातील विविध खोल्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली.
आरोपी अमूल व गोकुळ या नामांकित कंपन्यांच्या भरलेल्या दुधाच्या पिशव्यांमधील दूध बाहेर काढून त्यात अस्वच्छ पाणी मिसळत होते. तसेच अमूल ताजा, अमूल गोल्ड, अमूल A-2, गोकुळ सात्विक व गोकुळ क्लासिक या बनावट रिकाम्या पिशव्यांमध्ये दूध भरून त्यात पाणी टाकून अनियमित पद्धतीने पिशव्या चिकटवून विक्रीसाठी तयार केल्या जात होत्या. स्वतःचा आर्थिक फायदा करून ग्राहकांची फसवणूक करण्याचा हा प्रकार असल्याचे तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणात एकूण ७ आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे रवी अंजया कलिमारा, व्यंकय्या यादया बैरू, जवाजी श्रीनिवास, रामलिंग या लिंगय्या गजी, नरसिम्हा रामचंद्र कोल्हापल्ली, रजनी भास्कर व तुला, मंजुला रमेश जवाजी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन, बांद्रा-कुर्ला संकुल व वर्सोवा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. FDA कडून सहाय्यक आयुक्त भूषण दिलीप मोरे, नितीन सानप, अन्नसुरक्षा अधिकारी अनन्या रेगे, योगेश देशमुख व अन्य १५ अधिकारी सहभागी होते. वर्सोवा पोलीस ठाण्याकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपशिखा वारे, रात्रपाळी पर्यवेक्षक विवेक दाभोळकर, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कांबळे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सदर प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण यांनी तक्रार दाखल केली असून, बनावट पिशव्या, पुरवठा साखळी आणि दूध कुठे वितरित केले जात होते याचा पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.