

नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास करताना नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. कॅब आणि रिक्षांसाठी जास्त भाडं मोजावं लागत असून, प्रवासासाठी अपेक्षेपेक्षा अधिक वेळही खर्ची पडतेय. पुढील काळात मुंबई ते नवी मुंबई विमानतळ असा प्रवास अधिक सोपा आणि वेगवान होणार आहे. यासाठी सिडकोने विविध मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. मुंबई व नवी मुंबई विमानतळाला जोडणारी मेट्रो मार्गिका, ठाण्यापासून उन्नत मार्ग, तसंच NAINA प्रकल्पासह अनेक उपक्रमांमुळे कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी सुधारणा होणार आहे.
सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना या संदर्भातील एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिलीये. दक्षिण मुंबईहून नवी मुंबई विमानतळापर्यंतची जोडणी अधिक सक्षम करण्यासाठी उल्वे सागरी किनारा मार्गाचे काम सुरू आहे. हा मार्ग अटल सेतूपासून सुरू होणार आहे. सध्या दक्षिण मुंबईकडून येणाऱ्या वाहनांना चिर्ले जंक्शन आणि अमरा मार्गाचा वापर करून विमानतळ गाठावा लागतो, परंतु या नव्या कोस्टल रोडमुळे थेट आणि जलद मार्ग उपलब्ध होणार आहे.
उल्वे सागरी किनारा मार्गाचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झालंय. यापूर्वी हा मार्ग ऑगस्ट ते सप्टेंबर 2026 दरम्यान वाहतुकीसाठी खुला होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे काही कामांमध्ये अडथळे आल्याने आता हा मार्ग नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जातेय. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबईतील अटल सेतूपासून नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास अवघ्या पाच मिनिटांत शक्य होईल, असा दावा करण्यात येतोय.
मेट्रो लाइन 8 या प्रकल्पाचं कामही लवकरच सुरू होणार आहे. सुमारे 32 किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेला राज्य सरकारकडून मंजुरी मिळालीये. सध्या या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तपासणीच्या टप्प्यात असून या मार्गिकेतील सुमारे 9.5 किलोमीटर भाग भूमिगत असेल.
दरम्यान नवी मुंबई विमानतळाच्या उत्तरेकडे एक स्वतंत्र जोड मार्गही विकसित करण्यात आलाय. कळंबोलीहून थेट विमानतळापर्यंत जाणारा रस्ता तयार आहे. त्याचप्रमाणे पनवेलकडून विमानतळाच्या पूर्व बाजूला जोडणारा मार्गही पूर्ण झालाय. याशिवाय पनवेल द्रुतगती महामार्गाला विमानतळाशी थेट जोडणाऱ्या रस्त्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. या मार्गावर तीन पूल प्रस्तावित असून त्यापैकी दोन पूल पूर्ण झालंय. तर उर्वरित एक पूल येत्या काही महिन्यांत पूर्ण होणार आहे.
मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील प्रवाशांसोबतच पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांसाठीही हा संपूर्ण कनेक्टिव्हिटी नेटवर्क अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यासाठी MSRDC कडून एक क्लोव्हरलीफ इंटरचेंज देखील उभारण्यात येतोय. या इंटरचेंजमुळे विविध पुलांपर्यंत सहज पोहोचता येणार असून पुढे त्याच मार्गाने नवी मुंबई विमानतळ गाठणं सोपं होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.