

मुंबईसाठी IMD कडून ऑरेंज अलर्ट जारी
मुंबईत उद्या मुसळधार पावसाची शक्यता.
बीएमसीने ६ जुलै रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय
मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने सोमवारी मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेकडून खबरदारी म्हणून आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात पालिकेकडून पत्रक देखील काढण्यात आले आहे. पालिकेने सर्व शाळा आणि महाविद्यालयांना याबाबत आदेश देखील दिले आहेत.
मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला असून, जोरदार वाऱ्यांचाही इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील सर्व शासकीय, खासगी आणि महानगरपालिका शाळा तसेच महाविद्यालयांना सोमवार, ६ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने रविवारी याबाबत अधिकृत माहिती दिली. हवामान विभागाने शहरात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उद्या आवश्यकता असेल तर नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले.
दरम्यान, शासकीय आणि खासगी कार्यालये नियमितपणे सुरू राहणार असून, कर्मचारी व नागरिकांनी प्रवास करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच हवामान विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचेही आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, झाडे कोसळणे, वाहतुकीवर परिणाम होणे आणि जोरदार वाऱ्यांमुळे विविध ठिकाणी अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.