नालासोपाऱ्यातील तुळशी रिसॉर्टमध्ये दारूच्या पार्टीदरम्यान हवेत गोळीबार
आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन गावठी रिव्हॉल्वर जप्त केला
घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज तांबे, नालासोपारा
मुंबईच्या नालासोपारामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील कळंब परिसरातील तुळशी रिसॉर्टमध्ये दारूच्या पार्टीदरम्यान हवेत गोळीबार झाला. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गोळीबार करणाऱ्या संदेश गुरव या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी येथील रहिवासी संदेश गुरव हा आपल्या एका मित्रासोबत पार्टी करण्यासाठी नालासोपाऱ्यातील तुळशी रिसॉर्टमध्ये आला होता. यादरम्यान दोघांनीही रात्री उशिरापर्यंत दारू प्यायली. त्यानंतर मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या संदेश गुरवने अतिउत्साहाच्या भरात आपल्या जवळील गावठी रिव्हॉल्वर काढून हवेत गोळीबार केला.
अचानक झालेल्या गोळीबारामुळे रिसॉर्टमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडील गावठी रिव्हॉल्वर जप्त केला. प्राथमिक तपासात हा गोळीबार नशेत केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी शस्त्रास्त्र कायदा तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडे गावठी रिव्हॉल्वर कसा आला, त्याच्याकडे त्यासाठी कोणताही परवाना होता का? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे पर्यटनस्थळे आणि रिसॉर्ट परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर शस्त्रांचा वापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.