
मुंबई मोनोरेल सेवा २० सप्टेंबर २०२५ पासून मोठ्या सुधारणा कामांसाठी तात्पुरती बंद राहणार आहे.
चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक १९.७४ किमीचा मार्ग अपग्रेड आणि नूतनीकरणासाठी बंद ठेवला जाईल.
नव्या गाड्या, सीबीटीसी सिग्नलिंग, ताफ्याचे नूतनीकरण आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ही प्रमुख कारणे आहेत.
Monorail : मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे. मुंबईतील मोनोरेल सेवा शनिवार, २० सप्टेंबर २०२५ पासून बंद राहणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने यासंदर्भात माहिती दिली आहे. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक हा संपूर्ण १९.७४ किलोमीटरचा मार्ग तात्पुरत्या स्वरुपासाठी बंद राहणार आहे. मोठ्या सुधारणा करण्यासाठी एमएमआरडीएने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागचा उद्देश दैनंदिन प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुरळीत आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणे हा आहे.
मुंबई मोनोरेल का बंद होत आहे?
चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक हा मोनोरेलचा १९.७४ किमीचा मार्ग तात्पुरता बंद राहणार आहे. हा निर्णय खाली नमूद केलेल्या कारणांसाठी आवश्यक असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.
- नवीन गाड्यांचे जलद एकत्रीकरण (रोलिंग स्टॉक)
- प्रगत सीबीटीसी सिग्नलिंग सिस्टमची स्थापना
- विद्यमान ताफ्याचे नूतनीकरण
- भविष्यातील मेट्रो ऑपरेशन्ससाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
मोनोरेल ट्रेनची अपग्रेड आणि देखभालीची कामे रात्री ३.५ तासांमध्ये करण्याची परवानगी मिळाली आहे. मोठ्या प्रमाणातील कामे करण्यासाठी हा वेळ अपुरा पडत आहे. त्यामुळे संपूर्ण मोनोरेल सेवा बंद ठेवण्यात येणार असून या पद्धतीने सुधारणा अधिक जलद, कार्यक्षम आणि सुरक्षितरित्या पूर्ण करता येतील.
हा निर्णय कशामुळे झाला?
मोनोरेलमध्ये मागील काही काळात अनेकदा तांत्रिक बिघाड झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ब्रेकडाऊन झाल्याने प्रवासी मोनोरेल ट्रेनमध्ये अडकून पडले होते. मुसळधार पावसात म्हैसूर कॉलनीजवळ ५८२ प्रवासी अडकले होते. अँटॉप हिल आणि जीटीबीएन स्थानकादरम्यान ट्रेन थांबल्याने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढावे लागले होते.
मोनोरेलमध्ये कोणते अपग्रेड केले जाणार आहेत?
१. नव्या गाड्या - मेक इन इंडिया उपक्रमाच्या अंतर्गत दहा नवे रॅक जोडले जातील. आठ रॅक आधीच पोहोचले आहेत, उरलेले पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.
२. सीबीटीसी सिग्नलिंग सिस्टीम - एक आधुनिक, कम्युनिकेशन ट्रेन कंट्रोल सिस्टीम (सीबीटीसी) स्थापित केली जात आहे. ही सिस्टीम हैदराबादमध्ये विकसित केली जात आहे. मोनोरेलवर ही सिस्टीम पहिल्यांदाच वापरली जाणार आहे.
३. फ्लीट ओव्हरहॉल - जुन्या गाड्यांचे नूतनीकरण केले जाईल आणि ऑपरेटिंग टीमला नवीन सिस्टम आणि भविष्यातील मेट्रो संक्रमण हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.