MMRDA ने मेट्रो ५ च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांसाठी निविदा काढली
मेट्रो विस्ताराला वेग
ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरला जोडणारा मेट्रो मार्ग विकसित
संपूर्ण प्रकल्पांतर्गत १९ स्थानके उभारण्याचे नियोजन
ठाणे, भिवंडी आणि कल्याणमधील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मेट्रो ५ मार्गिकेचा विस्तार करण्याच्या कामाला आता वेग मिळणार आहे.MMRDA ने या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांसाठी निविदा काढली आहे. त्यामुळे धामणकर नाका ते दुर्गाडी, दुर्गाडी ते कल्याण आणि भोईरवाडी ते उल्हासनगर या मार्गांवरील मेट्रोचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
सध्या मेट्रो ५ च्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. कापूरबावडी ते धामणकर नाका असा ११.९० किलोमीटरचा हा मार्ग आहे. या मार्गावरील सर्व स्थापत्य कामे पूर्ण झाली असून आता मेट्रोची यंत्रणा बसवणे आणि चाचण्या घेण्याचे काम सुरू आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला हा मार्ग प्रवाशांसाठी सुरू करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
पहिल्या टप्प्यानंतर आता मेट्रो ५ च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात धामणकर नाका ते दुर्गाडी असा १०.४८ किलोमीटरचा मार्ग तयार केला जाईल. या कामासाठी सुमारे ७,३२६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तिसऱ्या टप्प्यात दुर्गाडी ते कल्याण आणि भोईरवाडी ते उल्हासनगर या मार्गांचा समावेश आहे. दुर्गाडी ते कल्याण हा मार्ग ६.५५ किलोमीटरचा, तर भोईरवाडी ते उल्हासनगर हा विस्तारित मार्ग ५.२७ किलोमीटरचा असेल. या प्रकल्पांमुळे एकूण ३४ किलोमीटरचा मेट्रो मार्ग विकसित होणार असून त्यावर १९ स्थानके उभारली जाणार आहेत.
या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे धामणकर नाका ते टेमघर या भागात भूमिगत मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे. तर राजनोली जंक्शन ते दुर्गाडी चौकदरम्यान दुमजली मार्ग उभारला जाईल. या मार्गावर खालच्या भागात रस्ते वाहतूक आणि वरच्या भागात मेट्रो धावणार आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरमधील प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होण्यास मदत होईल. रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी व्हायला हातभार लागेल. त्यामुळे या भागातील नागरिकांचे लक्ष आता मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, याकडे लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.