मुंबई लोकलमधील जीवघेण्या हल्ल्यांची मालिका काही संपत नाहीये... पुरुषांपाठोपाठ महिलांकडून एकमेकांवर हल्ले केले जाताहेत. त्यामुळे लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना धडकी भरतेय. मात्र, इतक्या घटना घडूनही रेल्वे प्रशासन ढिम्मं असल्याचं दिसतंय. या गुन्हेगारांचं नेमकं कशामुळे फावतंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
मुंबई लोकलमध्ये हाणामारी आणि वादविवाद... हे जणू प्रवाशांच्या पाचवीलाच पुजलेत! रोजची धक्काबुक्की, शिवीगाळ आणि जीवघेणे हल्ले आता मुंबईकरांसाठी नवे राहिलेले नाहीत. लोकलच्या भांडणात कोयता, चॉपर, बंदूक आणि लोखंडी कड्यांचा वापर झाल्याचा इतिहास ताजा असतानाच... आता थेट एका घातक पेपर स्प्रेची एन्ट्री झालीये, विशेष म्हणजे पुरूषांमध्ये सुरू असलेली हिंसा आता महिलांपर्यंत पोहचलीय. होय. कल्याण लोकलच्या महिला डब्यात जे काही घडलंय, ते ऐकलं तर लोकलने प्रवास करताना तुम्ही एकदा नाही, तर शंभर वेळा विचार कराल.. पाहा, सनकी महिलांच्या टोळी युद्धात काय झालं...
लोकलमध्ये सीटसाठी पेपर स्प्रेचा मारा
डोंबिवली स्थानकातून चढलेल्या महिलांनी रिकाम्या सीट्सवर ताबा मिळवला
कल्याणच्या आणि डोंबिवलीच्या महिलांमध्ये सीटवरून भांडण
शाब्दिक वादाचं रूपांतर थेट हाणामारीत झालं
डोंबिवलीच्या महिलेनं हँडबॅगमधून पेपर स्प्रे फवारला
संपूर्ण डब्यात घबराट पसरली, मात्र कुणालाही गंभीर दुखापत नाही
कल्याण लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात डोंबिवलीच्या महिलांनी रिटर्न मारत हुशारीने सीट्स मिळवल्या. पण गाडी कल्याण स्थानकात येताच कल्याणच्या प्रवाशांचा पारा चढला, कल्याण विरुद्ध डोंबिवली असा सीट्सवरून जोरदार राडा सुरू झाला. महिलांच्या दोन्ही टोळ्यांमध्ये तुंबळ जुंपली.. त्याचवेळी एका महिलेने पर्समधून थेट पेपर स्प्रे काढला आणि भांडणाऱ्या महिलांच्या तोंडावर फवारला.. महिलांनी कसाबसा चेहरा झाकल्याने मोठा अनर्थ टळला, पण काही काळ डब्यात श्वास घेणंही कठीण झालं..
वास्तविक, दिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतर महिलांना स्वसंरक्षण करता यावं, म्हणून या पेपर स्प्रेची संकल्पना समोर आली होती. बाजारात मेडीकलमध्ये हा पेपर स्प्रे सहज मिळतो. पण ज्याचा वापर नराधमांना धडा शिकवण्यासाठी व्हायचा, तोच स्प्रे आता क्षुल्लक कारणावरून सहप्रवाशांच्या जीवावर उठू लागलाय. लोकलच्या हाणामारीत आता या केमिकल वेपनची एन्ट्री झालीये. या जीवघेण्या प्रकारानंतर रेरेल्वेतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.
मुंबई लोकलमध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय... लोकलमधील सुमारे 90 टक्के जनरल डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेच नसल्याचं धक्कादयक वास्तव समोर आलंय... रेल्वेच्या एकूण 2 हजार 193 सर्वसाधारण डब्यांपैकी केवळ 225 डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत... तर आपत्कालीन परिस्थितीसाठी असलेली टॉक-बॅक प्रणाली 93 टक्क्यांहून अधिक डब्यांमध्ये उपलब्ध नसल्याचे समोर आलंय.. आणि य़ामुळेच गुन्हेगारांचं फावतं. आता लोकलची लाईफलाईन ही क्राईमलाईन बनण्याआधी रेल्वे प्रशासनाने एक्शन मोडमध्ये येण्याची गरज आहे.
गणेश कवडेसह वैदेही काणेकर साम टिव्ही मुंबई
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.