संघर्ष गांगुर्डे, कल्याण
मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोकलमध्ये बिडी ओढण्यास विरोध केल्याने एका प्रवाशावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात भरत टोपले हे गंभीर जखमी झाले असून, हल्ला करणारे तिन्ही तरुण घटनास्थळावरून पळून गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पहाटेच्या सुमारास कसारा लोकलमध्ये हा प्रकार घडला. उल्हासनगर येथे राहणारे भरत टोपले हे लोकलमधून प्रवास करत होते. यावेळी लोकलमध्ये तीन तरुण बिडी ओढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नये, या कारणावरून त्यांनी संबंधित तरुणांना विरोध केला.
मात्र, हा विरोध त्या तरुणांना सहन झाला नाही. त्यातून वाद निर्माण झाला. लोकल ठाकुर्ली स्थानकादरम्यान असताना त्यापैकी एका तरुणाने धारदार शस्त्राने भरत टोपले यांच्या डोळ्याजवळ वार केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे भरत टोपले जखमी झाले. त्यांना गंभीर दुखापत झाली असून, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हल्ला केल्यानंतर तिन्ही तरुण घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणी भरत टोपले यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांकडून आरोपी तरुणांचा शोध घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. अशा घटनांमुळे सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.