खारपाडा टोल नाक्यावर कोकणवासीयांचे आंदोलन
अपूर्ण महामार्गावर टोलवसुलीविरोधात संताप
सुरक्षित रस्ता, सेफ्टी ऑडिट आणि टोलबंदीची मागणी
“रस्ता पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच” – आंदोलकांचा इशारा
अमित गवळे, रायगड
मुंबई–गोवा महामार्ग कोकणवासीयांचा नेहमीचा यायचा जायचा रस्ता आहे, मात्र गेले अनेक वर्ष या महामार्गाचं काम रखडलं आहे. महामार्गावर रखडलेलं काम असतानाही टोल वसुलीचं काम सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याविरोधात सोमवारी मुंबई–गोवा महामार्गावरील खारपाडा टोल नाक्यावर ‘मुंबई–गोवा महामार्ग जनआक्रोश समिती’ आणि ‘मिशन कोकण साम्राज्य’ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले. कोकणवासियांनी “आधी सुरक्षित आणि पूर्ण महामार्ग द्या, मगच टोल घ्या!” अशा घोषणा देऊन संताप व्यक्त केला.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई–गोवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्ता अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. अपूर्ण पूल, उड्डाणपूल, अंडरपास आणि धोकादायक डायव्हर्शनमुळे प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. तरीही प्रशासनाकडून टोलवसुली सुरूच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणवासियांनी खारपाडा टोल नाक्यावर एकत्र येत आपला संताप व्यक्त केला.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासमोर अनेक ठोस मागण्या मांडल्या. महामार्गावरील सर्व अपूर्ण कामे पूर्ण होईपर्यंत टोलवसुली तात्काळ बंद करावी, अपूर्ण प्रकल्पांसाठी निश्चित वेळापत्रक जाहीर करावे, अपघातप्रवण ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, तसेच अपघातग्रस्तांसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय संपूर्ण महामार्गाचे स्वतंत्र संस्थेकडून ‘सेफ्टी ऑडिट’ करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, स्थानिक वाहनधारकांना टोलमाफी किंवा सवलतीचा मासिक पास लागू करावा, अशाही मागण्या मांडण्यात आल्या.
या आंदोलनाला कोकणभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही, तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही,” असा इशारा जनआक्रोश समितीने दिला. दरम्यान, ‘मिशन कोकण साम्राज्य’चे संस्थापक अजय आत्माराम यादव यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. “हा लढा केवळ आर्थिक लुटीविरुद्ध नाही, तर कोकणकरांच्या सन्मानासाठी आहे. अपूर्ण रस्त्यावरून प्रवास करून पूर्ण टोल देणे हा दुहेरी अन्याय आहे,” असे ते म्हणाले. आंदोलकांनी लोकप्रतिनिधींनाही थेट सवाल करत जनतेला न्याय देण्याची मागणी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.