

मालाडच्या प्लेटिंग कंपन्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर
दोन गटात तुफान हाणामारी
स्थानिक रहिवाशांनी केला गंभीर आरोप
संजय गडदे, साम टीव्ही
मुंबईच्या मालाड पूर्व येथील प्रभाग क्रमांक 42 मधील पालनगर परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत प्लेटिंग कंपन्यांमुळे गंभीर सुरक्षा आणि पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पालनगरमध्ये 600 रुपयांच्या उधारीवरून केमिकल कंपनीत काम करणाऱ्या कामगारांमध्ये वाद झाला या वादाचे रूपांतर तुफान हाणामारी आणि एकमेकांवर अॅसिड हल्ला करण्यापर्यंत गेला. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या परिसरात सुमारे 100 ते 125 प्लेटिंग कंपन्या स्थानिक नेते आणि प्रशासनाच्या कथित संगनमताने राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अॅसिडचा वापर होत असून, किरकोळ वादातून दोन कामगार गटांमध्ये झालेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी एकमेकांवर अॅसिड फेकण्यात आल्याने सहा जण जखमी झाले. यामध्ये संदीप सरोज याच्यावर माऊली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून इतर पाच जणांना महानगरपालिकेच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.घटनेदरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या काही सामान्य नागरिकांवरही अॅसिड उडाले. मात्र त्यांनाही आरोपी करत क्रॉस केस दाखल करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
या प्रकारामुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत कंपन्या सुरू आहेत, याबाबत प्रशासनाला याची माहिती नव्हती का, असा सवाल करत भ्रष्टाचाराचाही संशय व्यक्त केला जात आहे.
तत्पूर्वी, स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये सर्व अनधिकृत प्लेटिंग कंपन्यांची तात्काळ चौकशी, अॅसिडचा बेकायदेशीर वापर बंद करणे, पिण्याच्या पाण्याचा औद्योगिक वापर थांबवणे, बालमजुरी करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.