मुंबई : मुंबईतील एका कंपनीमध्ये मराठी माणसाला नोकरी मिळणार नाही, अशा आशयाची एचआरची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एका ग्राफिक कंपनीसाठी ग्राफिक डिझायनर हवा होता, त्यांना या पदासाठी मराठी तरुण नको होते. या एचआरच्या पोस्टचा कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही तीव्र शब्दात निषेध केला. त्यानंतर या पोस्टवर तिखट प्रतिक्रिया उमटल्यानंतर या फ्रिलान्सर एचआरने माफी मागत विषय संपविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, या विषयावर माफी मागून विषय संपणार आहे का? आज एका गुजरातीबहुल सोसायटीत मराठी भाषिक कार्यकर्त्यांना रोखण्यात आलं. दुसरीकडे महाराष्ट्र, मुंबईत मराठी तरुणांना नोकऱ्यांसाठी डावललं जात आहे. या घटनेवरून मराठी तरुणांची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. मुंबईकर तरुणांना काय वाटतं?
पुरोगामी विद्यार्थी संघटना अध्यक्षा साम्या कोरडे म्हणाली, 'कुठल्याही व्यक्तीला भारतात कुठेही काम करता येणे तसेच भाषेच्या आधारावर त्याला कुठली संधी नाकारली जाऊ नये, हा भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला दिलेला मूलभूत अधिकार आहे. महाराष्ट्रात तेही मुंबईमध्ये कार्यरत असणाऱ्या एका कंपनीच्या जाहिरातीत, मराठी लोकांना नोकरीसाठी संधी नाही, तेव्हा कुठल्या प्रकारच्या मानसिकतेतून ही गोष्ट आलेली आहे, याचा विचार करावा लागतो'.
'मराठी माणसाला मुंबईत घर नाकारलं जाण्यापासून ते महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला नेऊन ठेवण्यापर्यंत घटना राज्यात घडत आहेत, याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होते. या प्रकारच्या घटना जेव्हा घडतात, त्यावेळेस हे करण्याचे धाडस या कंपन्यांमधून कुठून येतं, असा प्रश्न इथे पडतो. अशा घटनांमागे सध्या सत्तेत असलेली मराठीद्रोही आणि महाराष्ट्रद्वेषी राजकीय वृत्तीच कारणीभूत आहे. या संतापजनक घटनेचा निषेध. या घटनांना जनता मतपेटीतून नक्कीच दर्शवून देईल, असे साम्या पुढे म्हणाली.
बँकिंग क्षेत्रातील कामाचा अनुभव असणारा करण निरभवणे म्हणतो की, 'गिरगाव सर्वांना सामावून घेणारा परिसर आहे. गिरगावमधील चौपाटीवर गणेश मुर्तींचं विसर्जन केलं जातं, त्यामुळे सर्व संस्कृतींना सामावून घेणारा हा परिसर आहे. याच मुंबईतील मराठी लोकांनी अनेकांना सामावून घेतलं आहे. अशा गिरगावमधील नोकरीसाठी मराठी तरुणांना डावललं जातंय, हे निंदनीय आहे. या क्षेत्रात अनेक मराठी भाषिक दिग्गज व्यक्तींनी नाव कमावलं आहे. अशा नोकरीसाठी मराठी लोकांना डावललं जात असेल, त्या दिग्गज लोकांचा अपमान आहे'.
'भाषावाद आणि त्या अनुषंगाने होणारा भेदभाव याच्या मागची मानसिकता समजून घेणे गरजेचे आहे. खरं पाहता या मानसिकता संविधानिक मूल्यांची पायमल्ली करत आहेत. या बाबत निश्चितपणे प्रबोधन होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जाती,धर्म या बाबतीत जसे कठोर कायदे आहेत, त्याच पार्श्वभूमीवर भाषावाद या आधारावर राज्याने विशिष्ट कायदे करणे गरजेचे आहे. कारण या घटनेमुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता असते, असे पत्रकार प्रवीण दाभाडे म्हणाले.
'आपल्या स्थानिक मातीत, आमच्या सारख्या मराठी तरुणांना नोकऱ्या नाकारणे चुकीचं आहे. या राज्यात परंप्रातीय लोंढे येऊन नोकऱ्या करत आहेत. जाती-धर्मांसोबत भाषेच्या आधारावर नोकरी नाकारणे चुकीचं आहे. मुंबईतील कंपनी मराठी माणसांना नोकरी नाकारत असेल तर चूक आहे. कंपनीवर कारवाई झाली पाहिजे. स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे. मुंबईत आधीच रोजगार कमी झाला आहे, अशा वेळी स्थानिक मराठी तरुणांनी काय करावे, असा प्रश्न सुजित धाडवे याने उपस्थित केला.
फिल्म प्रोडक्शनमध्ये कॉर्डिनेटर पदावर काम करणारा आतिश जाधव म्हणतो की, 'मराठी तरुणांमध्ये कौशल्य आहे. मात्र, काही वेळा मराठी तरुणांना डावललं जातं, ही खरी परिस्थिती आहे. अनेकदा सिनेसृष्टीतही मराठी तरुणांना कमी पगार दिला जातो. तसेच कमी पगाराच्या मोबदल्यात अधिक काम करून घेतलं जातं. काही जणांकडे कामाच्या संधी कमी असल्याने ते कमी पगारात काम करताना दिसतात'.
रिअल इस्टेट क्षेत्रात सेल्समन पदावर कार्यरत असणारा राजेश चौरसिया म्हणतो, 'एखादी एचआर एका संस्थेतील पोस्टसाठी मराठी लोकांना प्रवेश नाही, असं म्हणत असेल. तर त्यांनी योग्य कारण द्यायला हवं होतं. कंपनीतील पोस्टवर काम करताना भाषेचा काही अडथळा येणार आहे का, याबद्दल स्पष्ट सांगायला हवं होतं. मुंबईत भाषेच्या आधारावर नोकरी नाकारणे चुकीचे आहे. मराठी तरुणांमध्येही भरपूर कौशल्य आहे. त्यामुळे त्या पोस्टसाठी कोणत्या वेगळ्या कौशल्याची गरज आहे, याबद्दल सविस्तर लिहायला पाहिजे होतं'.
आयात आणि निर्यात क्षेत्रात एक्झिक्युटिव्ह पदावर काम करणारा रोहित गायकवाड म्हणातो, 'महाराष्ट्रात मराठी माणसाला रोजगारासाठी लढावं लागतयं, यापेक्षा मोठी खंत काय असू शकते. मुंबईत मराठी माणसाला नोकरी नाकारणे ही येणाऱ्या भविष्याची चेतावणी आहे. पुढील काळ मराठी माणसाठी भीषण असणार आहे. मराठी माणसाच्या हक्कांवर हल्ले होत आहेत. याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच मराठी माणसानेही सजग राहायला हवं'.
फायनान्स कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक पदावर काम करणारा विकी दाभाडे म्हणतो, 'मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. महाराष्ट्रात राहून तुम्ही व्यवसाय करता. त्यानंतर त्याच महाराष्ट्रातील मराठी माणसांवर तुम्ही असा अन्याय करता, ही सहन केली जाणारी बाब नाही'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.