शेलू-नेरळदरम्यान डेक्कन एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड
कर्जत मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प
लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत.
कर्जत-खोपोली लोकल सेवा बदलापूर स्थानकातून वळवण्यात आली
मयुरेश कडव, बदलापूर
Central Railway Local Delay Today मध्य रेल्वेच्या कर्जत मार्गावरील प्रवाशांना आज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. शेलू आणि नेरळ रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर धावणाऱ्या डेक्कन एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. या बिघाडाचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांसह लोकल सेवांवरही झाला असून अनेक गाड्या विविध स्थानकांवर खोळंबून राहिल्या आहेत.त्यामुळे आज अनेकांना ऑफिसमध्ये लेटमार्कला सामोरे जावे लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडे जाणारी डेक्कन एक्सप्रेस (Pune Deccan Express) शेलू आणि नेरळ स्थानकांच्या दरम्यान असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला. इंजिनमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर येताच रेल्वे प्रशासनाने तातडीने तांत्रिक पथक घटनास्थळी रवाना केले. मात्र, गाडी मार्गातच थांबल्याने डाऊन दिशेकडील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.या घटनेमुळे उद्यान एक्सप्रेससह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आणि कर्जत दिशेकडील लोकल सेवा उशिराने धावत आहेत. वांगणी रेल्वे स्थानकात कर्जत लोकल बराच वेळ थांबून असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले.
सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने अनेकांना आज लेटमार्कला समोरे जावे लागणार आहे. दरम्यान, डाऊन मार्गावरील कर्जत-खोपोली लोकल गाड्यांचे नियोजन बदलण्यात आले आहे. या गाड्या बदलापूर रेल्वे स्थानकातूनच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दिशेने वळवण्यात येत आहेत. त्यामुळे कर्जत (Karjat) आणि खोपोलीकडे (Khopoli) जाणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त त्रास सहन करावा लागत आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन एक्सप्रेसमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. बिघाड पूर्णपणे दूर झाल्यानंतरच एक्सप्रेस पुढे रवाना करण्यात येणार असून त्यानंतर खोळंबलेल्या लोकल आणि अन्य गाड्यांची वाहतूक सुरळीत करण्यात येईल. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.