बोरिवली स्टेशनवर पाण्यासाठी जास्त पैसे आकारले
व्हायरल व्हिडिओमुळे प्रकरण चर्चेत
बिल न देता पैसे घेतल्याची तक्रार
प्रवाशांकडून चौकशी व कारवाईची मागणी
IRCTC योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह
संजय गडदे, मुंबई
मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते विरार, डहाणू, पालघर, उधना आदी स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी IRCTC च्या माध्यमातून वॉटर वेंडिंग मशीन बसविण्यात आली होती. कमी दरात शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश असलेल्या या योजनेतून आता प्रवाशांचीच लूट होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
वायरल झालेल्या एका व्हिडिओनुसार, बोरिवली रेल्वे स्थानकावरील वॉटर वेंडिंग केंद्रावर ठराविक दरांपेक्षा जास्त पैसे आकारले जात आहेत. संदर्भात प्रवासी अमर सावंत यांनी एक व्हिडिओ बनवून सोशल माध्यमातून व्हायरल केला आहे. नियमांनुसार एक लिटर पाण्यासाठी स्वतःची बाटली असल्यास ५ रुपये आणि रेल्वेकडील बाटली किंवा ग्लासमध्ये घेतल्यास ८ रुपये आकारले जाणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात सर्रास १० रुपये घेतले जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
इतकेच नव्हे, अतिरिक्त पैसे घेतल्यानंतर ग्राहकांना कोणतेही बिल दिले जात नसल्याची तक्रारही प्रवाशांनी केली आहे. काही प्रवाशांनी वाद घातल्यानंतरच जादा घेतलेले दोन रुपये परत केल्याचेही या व्हिडिओत स्पष्ट दिसते. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेल्या या केंद्रांवरच जर लूट सुरू असेल, तर रेल्वे प्रशासन आणि IRCTC चे नियंत्रण नेमके कुठे आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. स्टेशन परिसरात सीसीटीव्ही, अधिकारी आणि देखरेख व्यवस्था असतानाही अशी प्रकारे उघड लूट कशी सुरू आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दररोज लाखो प्रवासी पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करतात. उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याची गरज अधिक असताना अशा प्रकारे प्रवाशांची फसवणूक होणे गंभीर बाब मानली जात आहे. प्रवाशांची मागणी आहे की, बोरिवलीसह सर्व स्थानकांवरील वॉटर वेंडिंग केंद्रांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, दरपत्रक स्पष्टपणे लावावे आणि बिल देणे सक्तीचे करावे. अन्यथा ‘स्वस्त पाणी योजना’ ही प्रवाशांसाठी नव्हे तर काही चालकांसाठी कमाईचे साधन ठरत असल्याची भावना अधिक तीव्र होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.