

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी
Mumbai BMC bribery case : गोवंडी येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एम-पूर्व' विभागात 'पिंक आर्मी' योजनेअंतर्गत तसेच सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेचे काम केलेल्या कंत्राटदाराचे बिल मंजूर करण्यासाठी साडेतीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांसह एका खासगी व्यक्तीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. सहायक अभियंता गणेश हनमंतराव चांदोलकर, उपअभियंता अविनाश दत्तात्रय दुधभाते आणि खासगी इसम विनीत खाडे अशी आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणातील ३४ वर्षीय तक्रारदाराने एम-पूर्व विभागाच्या कार्यक्षेत्रात पिंक आर्मी योजना आणि सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेचे काम केले होते. या कामाचे थकीत बिल मंजूर करून देण्यासाठी संबंधित लोकसेवकांनी तक्रारदाराकडे ३ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ५ मे २०२६ रोजी मुंबई एसीबीकडे लेखी तक्रार नोंदवली.
तक्रारीच्या अनुषंगाने ६ मे रोजी एसीबीने पडताळणी केली. या पडताळणीत सहायक अभियंता गणेश चांदोलकर यांनी तक्रारदाराकडे २ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच उपअभियंता अविनाश दुधभाते आणि खासगी इसम विनीत खाडे यांनीही लाचेची मागणी केल्याचे तपासात स्पष्ट झाले.
तपासादरम्यान, खासगी इसम विनीत खाडे याने लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, या प्रकरणात प्रत्यक्ष सापळा यशस्वी झाला नसल्याने ‘सापळा निरंक’ राहिल्याची नोंद एसीबीच्या अहवालात करण्यात आली आहे.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक २९/२०२६ नुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ मधील कलम ७ आणि ७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.२५ वाजता या गुन्ह्याची अधिकृत नोंद करण्यात आली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींची अंगझडती, वाहन, कार्यालय तसेच मोबाईल जप्तीची कारवाई सुरू आहे. याशिवाय आरोपींच्या घरझडतीची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली. तिन्ही आरोपींना 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' (BNSS) कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू आहे.
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त प्रवीण पावले यांच्या पर्यवेक्षणाखाली आणि पोलीस निरीक्षक रजनी उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण, अपर पोलीस उपआयुक्त अनिल घेरडीकर आणि अपर पोलीस उपआयुक्त अनंत साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.
दरम्यान, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास किंवा कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.