सुरज म्हसुरकर, मुंबई
मुंबई शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी आता AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे रस्त्यावर, चौकात किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या या नव्या योजनेनुसार, सार्वजनिक ठिकाणी एखादी व्यक्ती कचरा टाकताना दिसल्यास AI कॅमेऱ्याच्या माध्यमातून तिची नोंद केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित ठिकाणाजवळ तैनात असलेल्या वॉर्डला याची माहिती दिली जाईल. वॉर्ड त्या व्यक्तीवर लक्ष ठेवून पुढील कारवाई करणार आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास संबंधित नागरिकाला महानगरपालिकेच्या नियमानुसार दंड भरावा लागू शकतो.
या योजनेची सुरुवात प्रायोगिक स्वरूपात मुंबईतील जी-नॉर्थ विभागात करण्यात आली आहे. या भागात एकूण २३ AI कॅमेरे बसवण्याचे नियोजन आहे. सुरुवातीला या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ एका विभागापुरता मर्यादित राहणार नाही. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्येही ही योजना सुरू करण्याची तयारी केली जात आहे. यासाठी प्रत्येक विभागाला स्वतंत्र निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याच्या प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, हा AI कॅमेऱ्यांचा प्रयोग प्रत्यक्षात किती यशस्वी ठरतो आणि मुंबईच्या स्वच्छतेत किती सुधारणा घडवून आणतो, हे येत्या काळात स्पष्ट होईल. त्यामुळे मुंबईकरांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळावे आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.