Mumbai Air Pollution : दिल्लीनंतर मुंबईचा श्वास गुदमरतोय! BMC कडून २८ मार्गदर्शक तत्त्वे, नियम मोडल्यास होणार कारवाई

Mumbai Air Pollution News : मुंबईत एएक्यूआय गंभीर पातळीवर पोहोचल्याने बीएमसीने GRAP-4 लागू करून २८ कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नियम न पाळणाऱ्या ठिकाणांवर तत्काळ काम बंदी केली जाणार आहे.
Mumbai Air Pollution
Mumbai Air Pollution
Published On

What are the 28 BMC guidelines issued to reduce Mumbai air pollution? राजधानी दिल्लीनंतर आर्थिक राजधानी मुंबईची हवाही विषारी झाली आहे. मुंबईकरांना श्वसनाचा त्रास, घशांमध्ये खवखव यासारख्या समस्या जाणवत आहेत. मुंबईत होत असलेल्या वायू प्रदूषणामुळे मुंबईकारांना गुदमरल्यासारखे वाटत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता अतिशय खराब निर्देशांकात गेली आहे. मुंबईमधील बहुतेक भागात हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) गंभीर पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरात GRAP-4 लागू केले आहे.

प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी बीएमसीकडून मुंबईत GRAP 4 निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईतील अनेक भागातील हवेची गुणवत्ता खराब आणि अतिशय वाईट श्रेणींमध्ये घसरली आहे. या भागात मडगाव, देवनार, मालाड, बोरिवली पूर्व, चकाला-अंधेरी पूर्व, नेव्ही नगर, पवई आणि मुलुंड या भागाचा समावेश आहे.

मुंबई महानगरातील वायू प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने २८ मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.बांधकाम / प्रकल्प स्थळी वायू प्रदूषणास कारणीभूत ठरेल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे बीएमसीने म्हटलेय. ज्या ठिकाणी हवेची पातळी अतिशय खराब झालेली आहे. त्या ठिकाणी बांधकाम थांबवण्याचे आदेश बीएमसीने दिले आहेत. बांधकामांमुळे निर्माण होणाऱ्या धुळीमुळे शहरातील वायू प्रदूषण वाढत आहे. परिणामी बीएमसीने ५० हून अधिक बांधकाम स्थळे थांबवण्याच्या आणि बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

Mumbai Air Pollution
Election : जानेवारीत गोंधळ,फेब्रुवारीत दहावी-बारावीच्या परीक्षा, BMC च्या निवडणुका कधी होणार? महत्त्वाची माहिती समोर

बीएमसीची २८ मार्गदर्शक तत्त्वे कोणती ?

७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पांभोवती किमान ३५ फूट उंच पत्र्याचे आच्छादन उभारणे अनिवार्य आहे.

एक एकरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या सर्व बांधकाम प्रकल्पांभोवती किमान ३५ फूट उंचीचे तर एका एकरपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या बांधकाम प्रकल्पांभोवती किमान २५ फूट उंचीचे पत्र्याचे आच्छादन लावावे.

बांधकाम सुरु असलेल्या इमारतींना सर्व बाजूंनी हिरवे कापड / ज्यूट / ताडपत्रीने पूर्णपणे झाकून बंदिस्त करणे बंधनकारक आहे.

कोणतेही बांधकाम पाडताना संबंधित ठिकाण हे वरपासून खालपर्यंत संपूर्णतः ताडपत्री/हिरवे कापड/ज्यूट शीटने झाकलेले असावे. प्रत्यक्ष पाडकाम करतेवेळी सातत्याने पाणी शिंपडत राहावे.

बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी बांधकाम साहित्य चढवताना आणि उतरवताना त्यावर पाण्याची फवारणी करत राहावे.

बांधकामाच्या ठिकाणी धूळीचे कण निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारा राडारोडा /अन्य साहित्यावर सातत्याने आणि न चुकता पाण्याची फवारणी करावी.

बांधकाम साहित्य वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे सर्व बाजूंनी झाकलेली असावीत, जेणेकरून वाहतुकीदरम्यान बांधकाम साहित्य किंवा राडारोडा यांचे कण हवेत मिसळणार नाहीत. वाहनातून मर्यादेपेक्षा अधिक वजनाचे साहित्य वाहून नेऊ नये, जेणेकरुन वाहतुकीदरम्यान ते पडणार नाहीत.

सर्व बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी सर्व बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. याद्वारे सामानांची ने-आण करणाऱ्या वाहनांची चाके स्वच्छ केली आहेत आणि वाहनांमध्ये वजन मर्यादा पाळून साहित्य नेल्याची खातरजमा करता येईल.

सर्व बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी संवेदक (सेन्सर) आधारित वायू प्रदूषण संनिरीक्षण प्रणाली तैनात करावी आणि मर्यादेपेक्षा जास्त प्रदूषण पातळी आढळून आल्यास त्वरित कृती करावी. ही संनिरीक्षण प्रणाली जेव्हा आणि जशी मागणी केली जाईल, त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्य अधिकाऱ्यांना पर्यवेक्षणासाठी उपलब्ध करावी.

सर्व कामाच्या ठिकाणी ग्राइंडिंग, कटिंग, ड्रिलिंग, सॉइंग आणि ट्रिमिंगचे काम बंदिस्त भागात केले जावे आणि त्यामुळे उडणाऱ्या धूळयूक्त हवेपासून बचाव करण्यासाठी काम करताना सातत्याने पाणी फवारणी करावी.

प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी / परिसरात निर्माण होणारा बांधकाम आणि पाडकाम राडारोडा (डेब्रीज) हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बांधकाम व पाडकाम राडारोडा व्यवस्थापन आराखड्यानुसार, निर्देशित केलेल्या ठिकाणीच न्यावा. राडारोडा उतरवल्यानंतर, वाहन पूर्णपणे धुवावे.

साहित्य वाहून नेणाऱ्या सर्व वाहनांकडे वैध प्रदूषण नियंत्रण (PUC) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सक्षम अधिकाऱ्यांनी जेव्हा आणि जसे मागितल्यास ते सादर करावे.

सर्व बांधकाम कर्मचारी/व्यवस्थापकांनी मास्क, गॉगल, हेल्मेट इत्यादी वैयक्तिक संरक्षक उपकरणे परिधान करणे अनिवार्य असेल.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या पूल आणि उड्‌डाणपुलासारख्या सर्व प्रकल्पांच्या ठिकाणी २५ फूट उंचीची बॅरिकेडिंग केलेली असावी.

मेट्रो रेल्वे प्रकल्पाची जमिनीच्या वर सुरु असलेली सर्व कामे २५ फूट उंचीच्या बॅरिकेडिंगने झाकलेली असावीत. बांधकामाची जागा ताडपत्री / हिरवे कापड / ज्यूट शीटने झाकलेली असावी. बांधकामावेळी स्मॉग गन/वॉटर स्प्रिंकलरचा वापर करावा.

या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना एसआरए, म्हाडा, एमआयडीसी, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, बीपीटी, भारतीय विमानतळ प्राधिकरण, रेल्वे, शासकीय किंवा निमशासकीय प्राधिकरणे तसेच खासगी बांधकाम प्रकल्पांना अनिवार्य आहेत.

रात्री उशिरा अवैधपणे टाकला जाणारा राडारोडा रोखण्यासाठी सर्व विभागांच्या सहायक आयुक्तांनी विशेष पथके तैनात करावीत.

सर्व विभागांचे सहायक आयुक्त आणि इमारत बांधकाम प्रस्ताव विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वायू प्रदूषण कमी करण्याच्या अंमलबजावणीचे नियमितपणे निरीक्षण करावे. वायू प्रदूषण कमी करण्याच्या अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे समावेश असलेले पथक तैनात करावे.

दोन (वॉर्ड) अभियंता, एक पोलिस, एक मार्शल, वाहन.

Mumbai Air Pollution
Local Body Election : नगर परिषद, नगरपंचायत प्रचाराचा आज शेवटचा दिवस, रात्री १० वाजता तोफा थंडावणार

प्रत्येक पथकाचे नेतृत्व हे विभाग कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी करतील. विभाग स्तरावर ही पथके गठित करून तातडीने त्यांची नेमणूक करण्यात यावी. विभागनिहाय पथकांची संख्या पुढीलप्रमाणे असावी -

लहान विभाग- प्रत्येक विभागासाठी दोन पथके

मध्यम विभाग- प्रत्येक विभागासाठी चार पथके

मोठे विभाग- प्रत्येक विभागासाठी सहा पथके

अंमलबजावणी पथकांनी संबंधित परिसराला भेट देऊन कामाच्या ठिकाणाची व्हिडिओग्राफी करावी. कामाच्या ठिकाणी विहित सर्व तरतुदींचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास, काम थांबवण्याची नोटीस जारी करणे आणि/किंवा कामाचे ठिकाण सील करणे, यासारखी कठोर कारवाई तत्काळ करावी.

स्प्रिंकलर्स आणि स्मॉग गन इत्यादी व्यवस्था उभारण्याची कार्यवाही सर्व प्रकल्प प्रस्तावक / कंत्राटदारांनी काटेकोरपणे आणि न चुकता करावी.

बांधकाम साहित्य किंवा बांधकाम आणि पाडकाम साहित्य वाहून नेणारी वाहने, विहित तरतुदींचे पालन करत नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर जप्तीची कारवाई करावी.

वजनमर्यादेपेक्षा अधिक वजन वाहून नेणारी वाहने, न झाकलेली वाहने, रस्त्यांवर बांधकाम साहित्य पडेल अशा रितीने धावणारी वाहने यांच्यावर परिवहन आयुक्त कारवाई करतील. आठ वर्षांहून अधिक जुन्या अवजड डिझेल वाहनांना मुंबई कार्यक्षेत्रात वाहतूक करण्यास सक्त मनाई असेल.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दररोज बीपीसीएल, एचपीसीएल, आरसीएफ, टाटा पॉवर तसेच जवळपासच्या औद्योगिक वसाहत क्षेत्रातील उद्योग इत्यादी ठिकाणांहून उत्सर्जित होणाऱ्या वायू प्रदूषणाचे दैनंदिन स्वरूपात निरीक्षण करुन योग्य ती कारवाई करावी. या कारवाईचा दैनंदिन अहवाल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांना सादर करावा.

ज्यांच्यामध्ये ट्रैकिंग सिस्टम बसवलेली आहे, अशाच वाहनांचा कामांसाठी सर्व बांधकाम व्यावसायिक /विकासकांनी वापर करावा.

खुली/सुटी माती, वाळू, बांधकाम साहित्य आणि कोणत्याही प्रकारचा व कुठल्याही प्रमाणातील राडारोडा सीमांकित/समर्पित क्षेत्रामध्ये योग्यरित्या बॅरिकेड केलेल्या, पूर्णपणे झाकलेल्या / बंद केलेल्या ठिकाणी ताडपत्रीच्या आच्छादनाखाली ठेवावा, सार्वजनिक रस्ते, पदपथ, पदमार्गिका आणि मोकळ्या जागेवर बांधकाम साहित्य आणि राडारोडा टाकला जाणार नाही, याची खात्री करावी.

प्रत्येक बांधकाम प्रकल्पास्थळी बाहेर पडण्याच्या ठिकाणी वाहनांची चाके धुण्याची सुविधा असावी. प्रमुख स्स्त्यांवरील धूळ रोज व्हॅक्यूम स्वीपिंग किंवा पाण्याची फवारणी करून, घासून, झाडू मारून स्वच्छ करावी.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील भौगोलिक क्षेत्रामध्ये विशेषतः क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राऊंड) आणि कचरा जाळण्याच्या संभाव्य ठिकाणी कुठेही उघड्यावर कचरा जाळण्यावर पूर्णपणे बंदी असेल.

बांधकामाच्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कामगारांसाठी जेवण तयार करण्यासाठी लाकूड व तत्सम इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरात येत असल्याचे महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.अशा इंधनांमुळे मोठ्या प्रमाणात धूर पसरतो तसेच प्रसंगी सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेता संबंधित विकासकांनी अशा ठिकाणी कामगारांच्या भोजनाची व्यवस्था करावी.

जेणेकरुन त्यांना जेवण बनवण्यासाठी इंधन म्हणून लाकडे व तत्सम बाबी जाळाव्या लागणार नाहीत आणि पर्यायाने धूरही होणार नाही. तसेच, संबंधित बांधकामाची ठिकाणे अधिक सुरक्षित राहतील.

Mumbai Air Pollution
Pune Accident : पुण्यात आमदाराच्या कारने चिमुकलीला उडवले, अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com