

संजय गडदे,साम प्रतिनिधी
बेकरीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी तसेच व्यवसायावर कोणतीही कारवाई होऊ नये, यासाठी ७० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ६० हजार रुपये स्वीकारताना मुंबई महापालिकेच्या के/पश्चिम प्रभाग कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दुय्यम अभियंता निरवकुमार चुणीलाल जैसूर (वय ४३) आणि कामगार विजय रमेश पाटील (वय ४६) अशी एसीबीच्या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी लोकसेवकांची नावे आहेत. दोघेही अंधेरी पश्चिम येथील के/पश्चिम प्रभाग कार्यालयात कार्यरत आहेत. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बेकरीचा व्यवसाय करतात. त्यांना व्यवसाय सुरू ठेवायचा असल्यास तसेच बेकरीवर कोणतीही कारवाई होऊ नये, यासाठी आरोपी विजय पाटील यांनी स्वतःसाठी आणि दुय्यम अभियंता निरवकुमार जैसूर यांच्यासाठी ७० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी २ सप्टेंबर रोजी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी करण्यात आली. या वेळी विजय पाटील यांनी ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांनी तक्रारदारांची वरिष्ठ अधिकारी दुय्यम अभियंता निरवकुमार जैसूर यांच्याशी भेट घडवून आणली. या भेटीदरम्यान तडजोडीनंतर ६० हजार रुपयांची लाच देण्याचे निश्चित झाल्याचे एसीबीच्या तपासात समोर आले. त्यानंतर एसीबीने २ सप्टेंबर रोजी सापळा रचला. क/पश्चिम प्रभाग कार्यालयाच्या तळमजल्यावर लिफ्टजवळ तक्रारदाराकडून ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना विजय पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले. त्याच वेळी दुय्यम अभियंता निरवकुमार जैसूर यांना त्यांच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले.
कारवाईनंतर आरोपींची अंगझडती घेण्यात आली. दुय्यम अभियंता निरवकुमार जैसूर यांच्या अंगझडतीमध्ये दोन मोबाईल फोन मिळून आले. तर विजय पाटील यांच्या अंगझडतीमध्ये ४० हजार ८२० रुपये रोख आढळले. तसेच त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता तब्बल २ लाख ३७ हजार ६०० रुपये रोख मिळून आले. दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, या रोकड रकमेबाबतही तपास केला जात आहे.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक अनिल चित्तरवाड यांनी केले. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून सहायक पोलीस आयुक्त गंगाप्रसाद मुदिराज यांनी काम पाहिले. अपर पोलीस आयुक्त संदिप दिवाण, अपर पोलीस उप आयुक्त अनिल घेरडीकर आणि अपर पोलीस उप आयुक्त अनंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.