

मीरा-भाईंदर आणि वसई-विरारला जोडण्यासाठी नायगाव खाडीवर मोठा दुमजली पूल बांधला जाणार आहे. या पुलावरून एकाच वेळी मेट्रो आणि गाड्या धावणार आहेत. मीरा-भाईंदर ते वसई-विरार हा प्रवास सध्या रस्त्याने करताना लोकांना मोठा वळसा घ्यावा लागतो. त्यामुळे प्रवासाला ४५ ते ६० मिनिटं लागतात. मात्र हा पूल आणि मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर हा प्रवास काही मिनिटांत करता येणार आहे.
नायगाव खाडीवर दुमजली पूल बांधण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिलीये. हा पूल मेट्रो १३ मार्गिकेचा भाग असणार आहे. त्यामुळे आता या कामाला सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या दुमजली पुलाची लांबी ४.९८ किलोमीटर आणि रुंदी २८.६० मीटर असणार आहे. पुलाच्या खालच्या भागातून सहा पदरी रस्त्यावरून गाड्या जाणार आहेत. तर पुलाच्या वरच्या भागातून मेट्रो धावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पुलासाठी सुमारे १,६०० कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. पूल तयार झाल्यानंतर मीरा-भाईंदर आणि वसई-विरारमधील प्रवास अधिक सोपा आणि आरामदायी होणार आहे. त्यामुळे आता गाडी चालकांन मोठा वळसा घ्यावा लागणार नाही. मेट्रोचा पर्यायही उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांना आणखी एक सोयीचा मार्ग मिळणार आहे.
दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचा पुढे वसई-विरारपर्यंत विस्तार केला जाणार आहे. या विस्ताराला मेट्रो १३ असं नाव देण्यात आलंय. मेट्रो १३ मार्गिकेची एकूण लांबी २५.०३ किलोमीटर असणार आहे. त्यापैकी २१.७८ किलोमीटरचा मार्ग उंचावर असेल तर ३.२५ किलोमीटरचा मार्ग जमिनीखालून जाणार आहे. या मार्गावर एकूण १६ मेट्रो स्टेशन्स असतील. या मार्गाचा बदललेला आराखडा, मेट्रो नेमकी कुठून जाणार याचा मार्ग आणि प्रकल्पाचा खर्च काही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता.
मीरा-भाईंदरहून वसई-विरारला जाण्यासाठी सध्या वाहनांना मोठा फेरा मारावा लागतो. त्यामुळे या दोन भागांमधील थेट रस्ता तयार करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून अनेक वर्षांपासून होत होती. नायगाव खाडीवर पूल झाल्यास हा फेरा कमी होणार आहे. मेट्रो १३ देखील याच खाडीवरून जाणार असल्याने केवळ मेट्रोसाठी वेगळा पूल बांधण्याऐवजी मेट्रो आणि वाहनांसाठी एकाच दुमजली पुलाचा निर्णय घेण्यात आला.
एमएमआरडीएच्या १६०व्या बैठकीत या पुलाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. आता सरकारनेही त्याला मंजुरी दिलीये.
मीरा-भाईंदर ते वसई-विरार मेट्रो १३ प्रकल्पासाठी सरकारने १७,७२४.९९ कोटी रुपयांचा खर्च ठरवला आहे. प्रकल्पाचा खर्च पुढे वाढला तर त्याची जबाबदारी एमएमआरडीएवर राहणार आहे. महागाई वाढणं, परदेशी चलनाच्या दरात बदल होणं, प्रकल्पात काही बदल होणं किंवा कामाला उशीर झाल्यामुळे खर्च वाढणं अशा कारणांमुळे अतिरिक्त खर्च झाला तरी तो एमएमआरडीएला करावा लागणार आहे.
या प्रकल्पासाठी एमएमआरडीएचा हिस्सा ५९३.६३ कोटी रुपये असणार आहे. राज्य सरकारकडून २,८१०.३६ कोटी रुपयांचं कर्ज दिलं जाणार आहे. तर १३,२९३.७४ कोटी रुपये बाहेरून कर्ज घेतलं जाईल. या बाहेरून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारीही एमएमआरडीएवर असणार आहे.
मेट्रो १३ मार्गिकेच्या दोन्ही बाजूंना ५०० मीटरपर्यंतच्या भागात अतिरिक्त चटई क्षेत्राचा वापर करून पैसे उभारण्याची परवानगी एमएमआरडीएला देण्यात आलीये. या माध्यमातून प्रकल्पासाठी लागणारा पैसा उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मेट्रो १३ प्रकल्पाला मंजुरी देण्यासंदर्भातील शासन निर्णय नगरविकास विभागाने जारी केला आहे. या निर्णयात प्रकल्पाचा खर्च, खर्च वाढल्यास त्याची जबाबदारी आणि पुढील काळात पैसे कसे उभे करायचे याबाबत एमएमआरडीएवर काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.
दुमजली पुलाला मंजुरी मिळाल्यामुळे आता प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मीरा-भाईंदर आणि वसई-विरारमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. रस्त्याने जाणाऱ्या वाहनांसोबतच मेट्रोची सुविधा मिळणार असल्याने या भागातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.