

हार्ट अटॅक, रक्तदाब आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्येच औषधाचे मूळ घटक नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जेजुरीमध्ये इंडयूकेअर फार्मास्युटिकल अँड रिसर्च फाउंडेशन या कंपनीने अशी बनावट औषधं तयार केल्याचं तपासात उघड झालंय.
या कंपनीचा औषध उत्पादन परवाना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) रद्द केला आहे. याच कंपनीने पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयालाही औषधांचा पुरवठा केला होता. त्यामुळे रुग्णांना औषधांच्या नावाखाली प्रत्यक्षात औषधी घटक नसलेल्या गोळ्या आणि द्रव पदार्थ दिले जात असल्याचं समोर आलंय. इंडयूकेअर कंपनीने उत्पादनाची परवानगी नसतानाही नऊ प्रकारच्या औषधांचं उत्पादन आणि विक्री केल्याचं तपासात आढळून आलंय. यातील काही औषधे बनावट असल्याचंही स्पष्ट झालंय.
जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरात असलेल्या इंडयूकेअर फार्मास्युटिकल अँड रिसर्च फाउंडेशनच्या औषध उत्पादन केंद्राची FDA ने यावर्षी १४ आणि १५ जुलै रोजी तपासणी केली होती. या तपासणीत औषध तयार करण्याच्या प्रक्रियेत २५ गंभीर चुका आढळल्या होत्या. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजीही संस्थेचे परवाने रद्द करण्यात आले होते.
दरम्यान, FDA ने नुकत्याच केलेल्या तपासणीत आणखी धक्कादायक माहिती समोर आली. कंपनीच्या 'आयबीयुप्लस' आणि 'कॅरेविटा-एम' या औषधांमध्ये औषध म्हणून काम करणारे मूळ घटकच आढळले नाहीत. त्यामुळे ही औषधं बनावट असल्याचं घोषित करण्यात आलंय. त्याचप्रमाणे 'कॅरेगिल-४००' या औषधाच्या तब्बल १३ लाख ८६ हजार गोळ्या कोणतीही नोंद न करता तयार करण्यात आल्याचंही समोर आलंय.
पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयातून या कंपनीने पुरवलेल्या सुमारे १ कोटी ७२ लाख रुपये किमतीच्या निकृष्ट औषधांचा साठा ४ नोव्हेंबर रोजी जप्त करण्यात आला. या औषधांमध्ये हार्ट अटॅक, रक्तदाब आणि मधुमेहावरील औषधांचा समावेश होता. मात्र, या औषधांमध्ये आवश्यक औषधी घटकच नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी FDA ने २९ ऑक्टोबर रोजी कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. कंपनीने दिलेले उत्तर आणि २३ नोव्हेंबर रोजी झालेली प्रत्यक्ष सुनावणी यानंतर पुणे विभागाचे सह आयुक्त (औषधं) यांनी कंपनीचे फॉर्म २५ आणि फॉर्म २८ अंतर्गत असलेले औषध उत्पादन परवाने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे कंपनीला औषधांचं उत्पादन, पॅकिंग आणि वितरण तातडीने थांबवण्याचे आदेशही देण्यात आलेत.
विनापरवाना औषधांचं उत्पादन केल्याप्रकरणी कंपनीविरोधात औषधं आणि सौंदर्यप्रसाधनं कायदा १९४० अंतर्गत न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही औषध उत्पादकाला सोडलं जाणार नाही. अशा कंपन्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.