पुणे शहरातील बावधन परिसरात सूर्यदत्ता कॉलेजसमोर असलेल्या विवा हॉल मार्क सोसायटीतील एका सदनिकेला दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. तळमजला आणि ११ मजली इमारतीतील फ्लॅट क्रमांक ८०२ मध्ये ही आग लागल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीए अग्निशमन केंद्र, चांदणी चौक येथील अग्निशमन दल दुपारी १.४० वाजता घटनास्थळी रवाना झाले आणि २.५६ वाजता सोसायटीच्या गेटमध्ये दाखल झाले. फ्लॅटमध्ये आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्सीच्या सहाय्याने आठव्या मजल्यावर होजरील होज नेऊन खिडकी तसेच मुख्य दरवाजातून पाण्याचा मारा करत आग पूर्णपणे आटोक्यात आणली. या आगीत फ्लॅटमधील हॉलचे इंटिरिअर, विद्युत वायरिंग, टीव्ही, सोफा, स्टडी रूममधील कपाट, पुस्तके, बेड तसेच खिडक्यांच्या काचा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इतर दोन खोल्या व स्वयंपाकघरात धुरामुळे रंग खराब झाला आहे.
तसेच वरच्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ९०२ मधील खिडक्यांच्या काचा फुटून स्टडी रूममध्ये किरकोळ स्वरूपात आगीची झळ बसली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, या घटनेदरम्यान सोसायटीची फायर फायटिंग सिस्टीम बंद असल्याचे निदर्शनास आले असून ती तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. मदतीसाठी बाणेर येथील अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना झाले होते. मात्र आग नियंत्रणात आल्याने त्यांना परत जाण्यास सांगण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.