
मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना केलं आवाहन.
मनसैनिकांना अन्न-पाणी, औषधोपचाराची जबाबदारी घेण्याचं आवाहन.
अमित ठाकरे यांच्या पोस्टने जिंकले मराठा बांधवांचे मन.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. 'राज ठाकरे कुचक्या कानाचे, मानाला भुकालेलं पोरगं आहे.', असे वक्तव्य करत मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. मनोज जरांगे यांच्या या टीकेनंतर आता मनसे नेते अमित ठाकरे यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी या पोस्टद्वारे मनसे कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवा, औषधोपचारात मदत करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या या पोस्टने मराठा बांधवांचे मन जिंकले आहे.
अमित ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम, एक्स अकाऊंटवर मराठा आंदोलनासंदर्भात पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मनसैनिकांना आवाहन केले की, 'सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत. हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत… म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत. ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करीत आहेत. त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई-वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे.'
त्यांनी पुढे लिहिले की, 'माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे, जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी पुरवा, औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका, त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या, एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटा आहे. लक्षात ठेवा, ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली, तरी ते आपली जबाबदारी आहेत, आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल. आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील, ही मला खात्री आहे.'
एकीकडे मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर सडकून टीका तर दुसरीकडे मराठा बांधवांच्या मदतीसाठी अमित ठाकरे यांनी केलेली पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टने मराठा बांधवांची मनं जिंकली आहेत. मनोज जरांगे राज ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, 'राज ठाकरे कुचक्या कानाचा, मानाला भुकालेलं पोरगं आहे. त्याच्या घरी फडणवीस चहा पिऊन गेला. सगळा पक्ष बरबाद झाला तरी त्याला चालतं. आमच्या खेड्यात त्याला कुचक्या कानाचे म्हणातात.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.