
मनोज जरांगे पाटील मुंबईत आमरण उपोषणावर बसले आहेत.
आंदोलनाचा तिसरा दिवस असून राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत दाखल होत आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनावर सडकून टीका केली आहे.
आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन हे केवळ राजकीय आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी धडपड सुरू असल्याची जोरदार टीका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर मराठा समाजामध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील मराठा बांधव मु्ंबईत येत आहेत. आरक्षणासाठी मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसीबीसी आणि ई डब्ल्यूएसमधून आरक्षण दिले होते. परंतु मनोज जरांगे यांना ते मान्य नव्हते. त्यांना केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय आरक्षण हवे आहे. यासाठीच त्यांचे आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजातील जवळपास ५८ लाख कुणबी नोंदी शोधून त्यांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे.'
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मनोज जरांगेंवर सडकून टीका केली. 'सर्व प्रश्न सोडवले असतानाही आता केवळ राजकीय आरक्षण मिळावे यासाठीच मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन सुरू केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरू नये.' असे आव्हान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेनंतर मनोज जरांगे पाटील आता काय उत्तर देतात याकडे आता लक्ष लागले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतल्या आझाद मैदानावर आमरण उपोषणासाठी बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठा बांधव मुंबईत आले आहेत. तर राज्यभरातून आणखी मराठा बांधव येतच आहेत. कुणी ट्रेन, कुणी खासगी वाहनं तर कुणी बसने मुंबई गाठत आहेत. त्यामुळे आझाद मैदान परिसर आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली आहे. हे आंदोलनक याच परिसरात कसं तरी राहत दिवस काढत असल्याचे चित्र दिसत आहेत. जोरदार घोषणाबाजी या आंदोलकांकडून सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.