Pune Ring Road Project : पुणेकरांची दैनंदिन डोकेदुखी ठरलेली वाहतूक कोंडी कायमची फोडण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या तीन अत्यंत महत्त्वाकांक्षी उन्नत मार्ग (Elevated Corridors) प्रकल्पांचे भव्य भूमिपूजन संपन्न झाले. 'बांधा, वापरा व हस्तांतरित करा' (BOT) तत्त्वावर उभारल्या जाणाऱ्या या नाविन्यपूर्ण प्रकल्पांमुळे पुण्याच्या औद्योगिक आणि निवासी पट्ट्यातील वाहतुकीचा वेग प्रचंड वाढणार आहे.
या आधुनिक उन्नत मार्गांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यावर भविष्यातील मेट्रो मार्गिकांचा विचार करून आतापासूनच एकात्मिक डिझाईन (Integrated Design) तयार करण्यात आले आहे, ज्यामुळे मेट्रो उभारणीच्या खर्चात तब्बल ४० टक्क्यांची बचत होईल. आधुनिक मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर करून सिंगल पिलरवर उभारण्यात येणाऱ्या या रस्त्यांमुळे प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांहून अधिक वाचणार आहे.
हे तीन उन्नत मार्ग नेमके कुठून जाणार?
पुणे-शिरूर मार्ग हा ५४ किमीचा मार्ग असून, वाघोली-लोणीकंद परिसरातील प्रचंड कोंडी फोडत थेट शिरूरला जोडेल.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर कॉरिडॉर हा ५३ किमीचा मार्ग चाकणच्या अवाढव्य औद्योगिक पट्ट्याला (MIDC) थेट जोडणारा गेमचेंजर ठरेल.
हडपसर-यवत मार्ग हा ३१.५ किमीचा बहुस्तरीय मार्ग सोलापूर हायवेवरील ताण कमी करत उरुळी कांचनपर्यंत मेट्रोच्या पर्यायासह उपलब्ध असेल.
पुणे–शिरूर महामार्ग प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफ वरील सुमारे ५४ किलोमीटर मार्गाचा विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पात पहिल्या ३१ किलोमीटरमध्ये सहा पदरी उन्नत महामार्ग, तर स्थानिक वाहतुकीसाठी समांतर चार पदरी रस्ता विकसित केला जाणार आहे. उन्नत महामार्गाच्या सुरुवातीच्या सात किलोमीटर भागात भविष्यातील मेट्रो मार्गासाठीही तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते शिरूर प्रवासाचा कालावधी सुमारे दीड ते दोन तासांवरून ४५ ते ५० मिनिटांपर्यंत कमी होणार असून, वाहतूक अधिक सुरक्षित आणि गतिमान होईल.
हडपसर–यवत महामार्ग प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे ३१.५ किलोमीटर असून, त्यामध्ये सुमारे २५ किलोमीटरचा उन्नत बहुस्तरीय महामार्ग आणि सहा पदरी भूपृष्ठावरील रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पात उरुळी कांचनपर्यंत भविष्यातील मेट्रो मार्गासाठीही स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. तसेच हा मार्ग पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ आणि पुणे रिंगरोडशी जोडला जाणार असल्याने वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होऊन प्रवास सुलभ व सुरक्षित होईल.
तळेगाव–चाकण–शिक्रापूर कॉरिडॉर हा सुमारे ५३ किलोमीटर लांबीचा महत्त्वाचा प्रकल्प असून, त्याअंतर्गत सुमारे २६ किलोमीटरचा उन्नत बहुस्तरीय महामार्ग आणि ५३.२ किलोमीटर लांबीचा चार पदरी भूपृष्ठावरील रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे जलदगती वाहने आणि स्थानिक वाहतूक स्वतंत्र मार्गाने होणार असल्याने वाहतूक कोंडी कमी होईल. चाकण औद्योगिक परिसर, पुणे रिंगरोड आणि राष्ट्रीय महामार्गांना प्रभावी जोडणी मिळाल्याने औद्योगिक, व्यापारी आणि लॉजिस्टिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, पुणे परिसरातील वाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.