

डोंबिवली पलावात परिसरात दोन कोटी पंधरा लाखाचे एमडी, कोकेन जप्त
एक नायजेरियन नागरिकासह तिघांना अटक
अंमली पदार्थविरोधी मोहिमेत परिमंडळ ३ च्या पथकाची मोठी कारवाई
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
डोंबिवली पलावा परिसरात अमली पदार्थविरोधी मोहिमेत परिमंडळ ३ च्या पथकाची मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत नायजेरियन नागरिकासह तिघांना जेरबंद करण्यात आले आहे. या कारवाईत तब्बल २ कोटी १५ लाख ८० हजार रुपयांचा मेफोड्रोन एम.डी. आणि कोकेन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ३, कल्याण यांच्या आदेशानुसार अमली पदार्थविरोधी पथकाने १३ फेब्रुवारी २०२६ रोजी विशेष मोहीम राबवली. सहायक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, ग्रेड पोलीस निरीक्षक जितेंद्र ठोके, पो. हवालदार देवरे, पोलीस शिपाई राहुल शिंदे, अमित शिंदे, खुशाल नेरकर यांचं पथक मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होतं.
गस्तीदरम्यान गणेश नगर, उंबर्ली गाव, डोंबिवली पूर्व परिसरात सार्वजनिक रस्त्याच्या कडेला तिघे संशयास्पदरीत्या हातवारे करत चर्चा करताना आढळले. त्यापैकी एक व्यक्ती पिवळ्या रंगाच्या दुचाकीवर बसलेला होता. त्याच्या पाठीवर काळ्या रंगाची बॅग होती. संबंधित व्यक्ती परदेशी नागरिक असल्याचा संशय आला. तसेच दुचाकीच्या पुढील आणि मागील क्रमांक फलक वाकविलेल्या स्थितीत असल्याने वाहन क्रमांक स्पष्ट दिसत नव्हता. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला.
पोलिसांनी चौकशीसाठी पुढे जाताच तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सायंकाळी तिघांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर एम.डी. आणि कोकेन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे समोर आली आहेत.
१) नाकोरियन वय २६ वर्षे मूळ रहिवासी – नायजेरिया, वेस्ट आफ्रिका
२) अविनाश व्यंकटेश सदरला वय ३४ वर्षे रा. पनवेलकर आयकॉन, अंबरनाथ पश्चिम
३) गजेंद्रन संजीव नायडू वय ३४ वर्षे, रा. दोस्ती कॉलनी, चिंचपाडा, नवरे पार्क, अंबरनाथ पश्चिम
तत्पूर्वी, या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थांच्या साखळीबाबत अधिक तपास सुरू आहे. या कारवाईमुळे डोंबिवली-कल्याण परिसरातील अमली पदार्थ तस्करीला मोठा आळा बसणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.