यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट
कोकणात उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त
वाशीम आणि जळगाव येथे ४२.६ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमान
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता
नागरिकांना उष्णतेपासून बचाव करण्याचे आवाहन
राज्यात दुहेरी हवामानाचं चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला कोकणात उन्हाचा चटका आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत, तर दुसऱ्या बाजूला विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज (ता. ९) विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांत जोरदार वादळी पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि विदर्भातील इतर काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढलेला दिसून आला. वाशीम आणि जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याचबरोबर ब्रह्मपुरी, मालेगाव आणि भंडारा येथे तापमान ४१ अंशांच्या पुढे गेले. सोलापूर, धाराशिव, परभणी, अकोला आणि वर्धा जिल्ह्यांतही ४० अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले. उष्णतेमुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचे चित्र अनेक शहरांमध्ये दिसून आले. दरम्यान, महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.