महाराष्ट्रात पीयूसी प्रमाणपत्राच्या तपासणी शुल्कात वाढ
दुचाकी वाहनांचे शुल्क ५० रुपयांवरून ६० रुपये
तीनचाकी पेट्रोल वाहनांचे शुल्क १०० रुपयांवरून १२० रुपये
पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजी वाहनांसाठी शुल्क १२५ रुपयांवरून १५० रुपये
परिवहन विभागाने समितीच्या शिफारशींच्या आधारे सुधारित दरांना मंजुरी
महाराष्ट्रातील वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाहनांसाठी आकारण्यात येणाऱ्या पीयूसी (Pollution Under Control) प्रमाणपत्राच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. सुधारित दरांची अंमलबजावणी शुक्रवारपासून राज्यात सुरू झाली आहे. त्यामुळे आता वाहनांच्या पीयूसी तपासणीसाठी वाहनधारकांना पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
नव्या दरानुसार, दुचाकी वाहनांच्या पीयूसी तपासणीसाठी आता ६० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यापूर्वी हे शुल्क ५० रुपये होते. म्हणजेच दुचाकी वाहनांच्या पीयूसी शुल्कात १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, तीनचाकी पेट्रोल वाहनांसाठी पीयूसी तपासणी शुल्क १०० रुपयांवरून १२० रुपये करण्यात आले आहे. तर पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांसाठी असलेले शुल्क १२५ रुपयांवरून १५० रुपये करण्यात आले आहे.
डिझेल वाहनांसाठी पीयूसी तपासणी शुल्कातही वाढ करण्यात आली असून, आता वाहनधारकांना १५० रुपयांऐवजी १८० रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे डिझेल वाहनांच्या पीयूसी तपासणीसाठी ३० रुपयांची अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार आहे. पीयूसी केंद्र चालकांकडून शुल्कवाढीची मागणी सातत्याने केली जात होती. महाराष्ट्र स्टेट पीयूसी सेंटर ओनर्स असोसिएशन, ठाणे यांनी पीयूसी तपासणीच्या दरात वाढ करण्याची मागणी परिवहन विभागाकडे केली होती. पीयूसी केंद्र चालवताना येणारा खर्च, देखभाल आणि इतर वाढत्या खर्चाचा विचार करून शुल्कात बदल करण्याची मागणी करण्यात आली होती.
या मागणीचा विचार करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे परिवहन विभागाने पीयूसी शुल्काच्या सुधारित दरांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार शुक्रवारपासून नव्या शुल्काची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दरम्यान, वाहनधारकांनी आपल्या वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र वेळेत अपडेट करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वाढीव शुल्कामुळे वाहनचालकांच्या खिशावर काही प्रमाणात अतिरिक्त भार पडणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.