

राज्यात मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता
एकनाथ शिंदेंचे ऑपरेशन टायगर सुसाट
शिंदे ठाकरे गटाचे १४ आमदार फोडण्याची शक्यता
नवरात्रीआधी ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसेल
राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना पुन्हा मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. ऑपरेशन टायगरद्वारे एकनाथ शिंदे ठाकरेंचे १४ आमदार फोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवरात्रीच्या आधी ठाकरेंचे १४ आमदार शिवसेना शिंदेगटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही बातमी समोर येताच उद्धव ठाकरे यांनी मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. मातोश्रीवर दुपारी १२ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरेंच्या १४ आमदारांना शिवसेना शिंदे गटामध्ये आणण्याची जबाबदारी तीन मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. कोकण, मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांवर या ऑपरेशन टायगरची जबाबदारी असणार आहे. यापैकी ६ आमदारांना सरकारमधली चांगली खाती आणि मंत्रिपदे पाहिजे आहेत. तसंच काहींची महामंडळ अध्यक्ष आणि राज्यमंत्रिपदी वर्णी लागण्यावर पक्षांतर्गत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. नवरात्रीआधी ठाकरेंच्या १४ या आमदारांचा पक्षप्रवेश झाल्यास ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.
ठाकरेगटाचे आमदार कैलास पाटील यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'ऑपरेशन टायगर नेहमी चर्चेत येते. महाराष्ट्रापुढे अनेक प्रश्न आहेत. पावसाने ऑगस्टमध्ये दडी मारली, शेतकऱ्यांची पिकं वाळून चालली आहेत, बेरोजगारीचा प्रश्न, एकही परीक्षा अशी नाही की तिथे पेपर फुटत नाहीत. सरकारने वेळ असेल तर इथे वेळ द्यावा. ऑपरेशन टायगर करण्याची गरज नाही. तुमचे बहुमत पूर्ण आहे. आधी तुमच्या आमदारांना न्याय द्या. आमचे १४ आमदार फुटणार नाही. असं काहीच होणार नाही आहे.'
तसंच, ' सरकारपुढे अनेक प्रश्न आहेत. मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत, शेतकरी अडचणीत आहेत, विद्यार्थी पेपरफुटीविरोधात आंदोलन करत आहेत तर सरकारने आधी ऑपरेशन टायगरच्या गोष्टी करण्यापेक्षा याकडे लक्ष द्यावे. शिवसेनेचा एकही आमदार पक्ष सोडून जाणार नाही याची मला खात्री आहे. या अफवा सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक पसरवल्या जातात. मूळ प्रश्नापासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी हे प्रकार सत्ताधारी पक्षाकडून केले जातात. आमचा कोणताच आमदार शिंदेसेनेत जाणार नाही.', असा विश्वास कैलास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.