Governor appointed MLC: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. सर्वोच्च न्यायालयाने विधान परिषदेतील १२ राज्यपाल नामनियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठविल्यानंतर राज्य सरकारने या नियुक्त्या तातडीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महायुती सरकारने आमदारांच्या नियुक्तीबाबतचे सूत्र निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीने १२ सदस्यांची यादी राज्यपाल रमेश बैस यांना दिली जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
यामध्ये भाजपच्या वाट्याला ६ जागा, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ३ जागा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागा मिळणार असल्याची माहिती आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट सरकारमध्ये सहभागी होण्याआधी भाजप आणि शिंदे सरकार यांच्यात ८ आणि ४ असे सूत्र निश्चित झाले होते. मात्र अजित पवार यांच्या सहभागानंतर महायुतीच्या तिन्ही पक्षांनी राज्यपाल नामनियुक्तीच्या समान म्हणजे प्रत्येकी ४ जागा घ्याव्यात, अशी चर्चा झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, भाजपच्या कोट्यातून ६, तर शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून प्रत्येकी ३ नावे दिली जाणार आहेत. तत्पूर्वी या नावांना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली जाईल. त्यानंतर १२ सदस्यांची एकत्रित यादी राजभवनाला पाठवली जाईल.
विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त आमदारांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याने तिन्ही पक्षांकडून आता कुणाला संधी मिळते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. इच्छुकांमध्ये भाजप आणि शिंदे गटात संख्या जास्त आहे.
भाजपची नावे दिल्लीतून निश्चित होतील, तर शिंदे आणि अजितदादा गटाची नावे अनुक्रमे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निश्चित केली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या नियुक्त्यांनंतर विधान परिषदेतील संख्याबळाचे पक्षीय समीकरण बदलणार आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.