
फडणवीस यांनी वरळी येथे भाजपच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केली.
त्यांनी “अच्छा सिला दिया...” हे गाणे गात त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
महापौर पदाच्या वादावरून त्यांनी ठाकरेंवर आरोप केले.
बीएमसी निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळीच्या एनएससीआय डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात भाषण करताना थेट ठाकरे बंधुंवर निशाणा साधला. मुंबईच्या विकासावरून त्यांनी ठाकरे बंधूंना खडेबोल सुनावले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी खास गाणं देखील गायलं. उद्धव ठाकरे यांच्यासाठी त्यांनी 'अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का...', हे गाणं गात सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. या भाषणादरम्यान आक्रमक झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना २०१९ च्या निवडणुकांची आठवण करून देत हे गाणं गायलं.
देवेंद्र फडणवीस यांनी भाषणादरम्यान आठवण करून दिली की, 'गेल्या वेळी उद्धव ठाकरेंना महापौर आपला हवा होता. मग आम्ही थोडाही विलंब केला नाही. सर्वांना बोलावले आणि सांगितले की तुम्ही महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष घेऊ शकता. आम्ही विरोधकांचे काम करणार नाही पण जर तुम्ही चूक केली तर आम्ही त्यावर लक्ष ठेवू.'
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, 'पण २०१९ च्या निवडणुका आल्या आणि मग गाणे गायला लागले "अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लुट लिया घर यार का." या गाण्याच्या माध्यमातून फडणवीस यांनी आरोप केला की, उद्धव ठाकरें यांना उपकाराची कदर नाही. तसंच, ठाकरे बंधुंवर निशाणा साधत फडणवीस म्हणाले की, 'बाळासाहेब ठाकरे हे एक ब्रँड होते. फक्त नाव जोडल्याने कोणी ब्रँड बनत नाही.'
मुंबई महानगर पालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल असा दावा करत त्यांनी सांगितले की, 'भाजप पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे मुंबईची पुनर्कल्पना करत असताना, काही लोक फक्त खुर्चीसाठी पुनर्कल्पना करत आहेत. मात्र त्यांना ती खुर्ची मिळणार नाही. महायुती मुंबईवर भगवा झेंडा फडकवेल आणि बीएमसीमध्ये महायुतीचा महापौर असेल.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.