

विधान परिषद निवडणूक निकालावरून महायुतीत वाद
भाजपने विधान परिषद पराभवाचे खापर शिंदेसेनेवर फोडले
नवनाथ बन यांची शिंदेसेनेवर टीका करणारी सोशल मीडिया पोस्ट व्हायरल
विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. पाच जागांपैकी फक्त २ जागांवर भाजपला यश मिळाले. तर महाविकास आघाडीने ३ जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीतील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. निवडणूक निकालावरून आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी उडाली आहे. भाजपने या पराभवाचे खापर थेट शिंदेसेनेवर फोडलं आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट करत शिंदेसेनेवर आरोप केले आहेत. निवडणुकीत शिवसेनेने सहकार्य केलं नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांची पोस्ट सध्या व्हायरल होत असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनेच्या भूमिकेने महायुतीच्या गणिताला सुरुंग लागला आहे. निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने मित्रपक्षावर आरोप केलेत. पुण्यात पाठिंबा दुसऱ्याला दिला आणि संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात प्रचार केल्याप्रकरणी भाजपने शिवसेनेला सवाल केला. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान झाले. भाजपने शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महायुतीचा धर्म कुणी पाळला अन् कुणी मोडला? निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने मित्रपक्ष शिंदेसेनेवर निशाणा साधला.
भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये शिंदेसेनेवर निशाणा साधला. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, 'शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला. त्यांना मिळालेली मतं पदवीधर निवडणुकीत भाजपला मिळाली नाहीत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच्या विरोधात प्रचार केला. त्याचाही फटका बसला.'
तसंच, 'शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता. मात्र, पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नाही.', असे मत नवनाथ बन यांनी व्यक्त केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.