

मावळ तालुक्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणाव
अर्ज भरण्याच्या दिवशी राष्ट्रवादी आणि भाजप आमने-सामने
सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची भव्य रॅली
दिलीप कांबळे, साम प्रतिनिधी
मावळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी एकाच दिवशी अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरवला होता. त्यानुसार आज दोन्ही पक्षांचे उमेदवारी अर्ज मोठ्या शक्तीप्रदर्शनात दाखल करण्यात आले.
आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडून भव्य रॅली आणि जाहीर सभा घेण्यात येत उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडूनही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज मोठ्या गर्दीत दाखल करण्यात आले. राज्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची युती असली तरी मावळ तालुक्यात या निवडणुकीत स्थानिक पातळीवर युती होणार नसल्याचे बाळा भेगडे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.
त्याप्रमाणे आज दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे वेगवेगळे उमेदवारी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे ही निवडणूक माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी प्रतिष्ठेची केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यातच सुनील शेळके यांच्या गटातील प्रमुख दावेदार तसेच इंदोरी -वराळे गटातील प्रभावी नेता प्रशांत भागवत यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे या निवडणुकीला अधिकच हाय व्होल्टेज वळण मिळाले आहे.
आज अर्ज भरण्याच्या नियोजनानुसार सकाळी साडेनऊ ते दुपारी एक वाजेपर्यंतचा वेळ राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आला होता, तर त्यानंतरची वेळ भाजपच्या रॅलीसाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र राष्ट्रवादीचा कार्यक्रम वेळेत न संपल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकाच ठिकाणी एकत्र जमले. यावेळी दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने काही काळ वातावरण तापले होते आणि तणाव निर्माण झाला. याच वेळी आमदार सुनील शेळके यांचे भाषण सुरू असून त्यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
पोलिसांनीही प्रसंग योग्य पद्धतीने हाताळत भाजप कार्यकर्त्यांना एका रांगेत पुढे जाण्याचे निर्देश दिले, तर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना कार्यक्रमस्थळ रिकामे करण्यास सांगण्यात आले. सुदैवाने या ठिकाणी केवळ घोषणाबाजी आणि शाब्दिक चकमक झाली असून कोणताही गंभीर अनुचित प्रकार घडला नाही. एकंदरीतच अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे मावळ तालुक्यात आज हाय व्होल्टेज ड्राम्याचे चित्र पाहायला मिळाले.
उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असला तरी आजच दोन्ही पक्षांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनात अर्ज भरून आपली ताकद दाखवली आहे. त्यामुळे पुढील काळात ही निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता असून, मावळात ही लढत आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रतिष्ठेची बनल्याचे स्पष्ट होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.