इंदू मिल स्मारकाला २०२७ ची डेडलाईन! स्मारकासाठी सरकारचा ॲक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्याचे महत्त्वाचे आदेश

Mumbai Indu Mill Memorial Project: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेत. एमएमआरडीएला कामाच्या प्रगतीवर दररोज लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
Indu Mill Ambedkar Memorial Gets 2027 Deadline | Cm Fadnavis Issues Key Orders
Indu Mill Ambedkar Memorial Gets 2027 Deadline | Cm Fadnavis Issues Key Orderssaam tv
Published On: 
Summary
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला.

  • कंत्राटदाराला सुधारित कामाचे वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश.

  • एमएमआरडीए स्मारकाच्या कामावर दररोज नियंत्रण ठेवणार.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे उर्वरित काम गतीने पूर्ण करून हे स्मारक २०२७ पर्यंत पूर्ण करावे. त्यासाठी कंत्राटदाराने सुधारित कामाची कालमर्यादा निश्चीत करून उच्चाधिकार समितीकडे तसा अहवाल सादर करावा. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या कामाच्या प्रगतीवर दररोज नियंत्रण ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रकल्पाची सद्यस्थिती, स्ट्रक्चरल स्टीलचे फॅब्रिकेशन, ब्रॉन्झ क्लॅडिंग, बांधकामाची गुणवत्ता, कंत्राटदाराच्या अतिरिक्त आर्थिक मागण्या आणि काम पूर्ण करण्याच्या कालमर्यादेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

कामातील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही

स्मारकाचे काम अपेक्षित गतीने पूर्ण होत नसल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. कंत्राटातील अटी व शर्तींचे पालन करून काम पूर्ण करणे ही संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी आहे. आर्थिक मागण्यांमुळे काम थांबविणे योग्य नसून, कामातील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. संबंधित एजन्सीची काम पूर्ण करण्याची क्षमता आणि बांधिलकी तपासून आवश्यकतेनुसार पर्यायी एजन्सी नियुक्त करण्यासह कठोर कारवाईच्या पर्यायांचाही विचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

आर्थिक दाव्यांची छाननी करून नियमानुसार निर्णय

कंत्राटातील तरतुदी, जीएसटी दरातील बदल, दरवाढ निर्देशांक आणि अतिरिक्त कामांमुळे निर्माण झालेल्या खर्चाची तांत्रिक व आर्थिक पडताळणी करावी. जीएसटी दरातील बदलाबाबत कंत्राटातील तरतुदींनुसार कायदेशीर अभिप्राय घ्यावा. ब्रॉन्झ क्लॅडिंगसाठी आवश्यक साहित्य खरेदी करता यावे, यासाठी बँक हमीच्या आधारे आगाऊ रक्कम देण्याच्या प्रस्तावाची तपासणी करावी. सर्व आर्थिक प्रस्ताव एकत्रितपणे समितीसमोर ठेवून नियमानुसार निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

स्ट्रक्चरल स्टील आणि ब्रॉन्झ क्लॅडिंगची कामे समांतरपणे पूर्ण करा

स्ट्रक्चरल स्टीलची उभारणी आणि ब्रॉन्झ क्लॅडिंगची कामे एकमेकांशी समन्वय साधून समांतरपणे पूर्ण करावीत. आवश्यक साहित्य, यंत्रसामग्री, मनुष्यबळ, फॅब्रिकेशन आणि प्रत्यक्ष बांधकाम यांचा समावेश असलेले सुधारित वेळापत्रक सादर करावे. प्रत्येक टप्प्याची जबाबदारी आणि कालमर्यादा निश्चित करून त्यानुसार नियमित आढावा घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देशित केले.

स्मारकाच्या संरचनात्मक रचनेची गुणवत्ता, सुरक्षितता आणि स्थैर्य याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. संबंधित एजन्सीची जबाबदारी कायम ठेवून कामाची गती वाढवावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हा महत्वाचा सार्वजनिक प्रकल्प असल्याने त्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक हा जनभावनेशी निगडित महत्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे या कामाकडे केवळ एक प्रकल्प म्हणून न पाहता त्याचे सामाजिक महत्व लक्षात घेऊन सर्वांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

Indu Mill Ambedkar Memorial Gets 2027 Deadline | Cm Fadnavis Issues Key Orders
शेतकरी, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय, जाणून घ्या एका क्लिकवर

कंत्राटदाराने काम पूर्ण करण्याची मुदत निश्चित करतानाच आवश्यक नियोजन आणि जोखीम यांचा विचार करणे अपेक्षित होते. कोणतेही कारण देऊन दहा महिने काम थांबविणे योग्य नाही. कंत्राटातील अटी व शर्तींचे पालन करून काम पूर्ण करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. शासनाकडून आवश्यक आर्थिक बाबींची नियमानुसार छाननी केली जाईल; मात्र त्यामुळे काम रखडता कामा नये. स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराने ठोस नियोजनासह पुढाकार घ्यावा, असेही मंत्री शिरसाट यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.