लोणावळ्यामध्ये २०१७ मध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या दुहेरी हत्या प्रकरणाचा आज कोर्टाने निकाल दिलाय. या हत्याकांड प्रकरणातील आरोपी सलीम शब्बीर शेखची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. या हत्याकांड प्रकरणाचा तब्बल ७ वर्षांनंतर कोर्टाने निकाल दिला. ही घटना घडली होती तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये लोणावळ्याच्या भूशी डॅम परिसरामध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली होती. चोरीच्या उद्देशाने दोघांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील एक आरोपी अल्पवयीन होता. त्यामुळे त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते. तर दुसरा आरोपी तुरूंगात होता. याप्रकरणाचा कोर्टाने आज निकाल दिला. पुरावा नसल्याने कोर्टाने सलीम शब्बीर शेखची निर्दोष मुक्तता केली.
लोणावळ्यातील सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सार्थक वाकचौरे आणि श्रुती डोंबरे इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होते. सार्थक हा अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीचा रहिवासी होता. तर श्रृती पुणे जिल्ह्यातल्या ओतूर येथील रहिवासी होती. तीक्ष्ण वस्तूने दोघांच्या डोक्यावर वार करत हत्या करण्यात आली होती.
श्रृती आणि सार्थक या दोघांनाही निर्वस्त्र करत त्यांची हत्या करण्यात आली होती. दोघांचेही हात बांधलेले होते आणि श्रुतीच्या तोंडामध्ये कापड कोंबले होते. दोघांच्याही शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या होत्या. या घटनेमुळे लोणावळ्यामध्ये खळबळ उडाली होती. श्रुती आणि सार्थकची हत्या कशी झाली याचा उलगडा घटनेच्या अडीच महिने झाला नव्हता.
मात्र यातील एका आरोपीने हॉटेलमध्ये दारूच्या नशेत त्याच्या मित्राकडे याची वाच्यता केली. ही बाब एका खबऱ्याने पोलिस शिपायाला दिली अन् त्यानंतर या हत्या प्रकरणाला वाचा फुटली होती. उज्वल निकाम यांनी या हत्येप्रकरणी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं होतं. श्रुती आणि सार्थकच्या हत्येप्रकरणी राज्यभरात संतापाची लाट होती. सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनं देखील केली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.