

केडीएमसीत अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर
अतिधोकादायक इमारतींसाठी धोरण राबवा ठाकरेसेनेची आयुक्तांकडे मागणी
स्थानिक नागरिकांसह ठाकरे गटाकडून संभाव्य दुर्घटनांची भीती व्यक्त
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकलं आहे. पालिकेने ४५१ इमारती धोकादायक घोषित केल्या आहेत. त्यापैकी तब्बल २२५ इमारती अतिधोकादायक श्रेणीत असल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतींमध्ये सुमारे एक लाख ३० हजार नागरिक वास्तव्यास असल्याने संभाव्य दुर्घटनांची भीती व्यक्त केली जात आहे.
केडीएमसी क्षेत्रात धोकादायक इमारतींची संख्या वाढत आहे. त्याचदरम्यान अतिधोकादायक इमारतींसाठी कोणतेही ठोस धोरण नसल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. पालिका क्षेत्रात २५० धोकादायक तर २२५ अतिधोकादायक इमारती असल्याचे सांगत या इमारतींमधील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
अतिधोकादायक इमारतींसाठी स्वतंत्र धोरण राबवावे तसेच त्याबाबत तातडीने घोषणा करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर आणि प्रतोद संकेश भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केडीएमसी आयुक्तांना निवेदन देत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली.
धोकादायक इमारतीवर भाष्य करताना संकेश भोईर यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जीविताचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे म्हटले. तर गटनेते उमेश बोरगावकर यांनी अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी स्पष्ट धोरण आवश्यक असल्याचे नमूद केले.
तत्पूर्वी, ठाणे शहरातील महापालिकेच्या धर्तीवर कल्याणमध्ये अतिरिक्त एफएसआय, इन्सेंटिव्ह एफएसआय, प्रीमियम रिलॅक्सेशन मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच यूडीसीपीआर नियम ७.६ अंतर्गत एफएसआय मंजूर करण्याची मागणी करण्यात आलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.