Mumbai Mhada: कामाठीपुराचा चेहरामोहरा बदलणार! ७३४ इमारतींचा होणार कायापालट; मुहूर्तही ठरला

Mumbai’s Historic Kamathipura Set for Major Transformation: मुंबईतील ऐतिहासिक कामाठीपुरा समूह पुनर्विकासाला गती मिळाली आहे. ३४ एकर क्षेत्रातील ७३४ इमारतींच्या पुनर्विकासासाठी C&DA करार पूर्ण झाला असून दिवाळीत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
KAMATHIPURA REDEVELOPMENT
KAMATHIPURA REDEVELOPMENTsaam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईतील ऐतिहासिक कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता मोठी गती मिळाली असून, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रत्यक्ष पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत (MBRRB) राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी भगीरथी हाऊसिंग प्रा. लि. आणि माथी डेव्हलपर्स यांच्यासोबत आज Construction & Development Agency (C&DA) करार करण्यात आला. वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आणि विकासक कंपनीचे संचालक अतुल गोयल यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

KAMATHIPURA REDEVELOPMENT
Good News: 7 तासांत पुण्यावरून बीडला पोहचा, नवीन ट्रेन सुरू; तिकीट किती अन् थांबे कुठे?

कामाठीपुरा परिसरातील जुन्या आणि जीर्ण इमारती, दाट लोकवस्ती, अरुंद रस्ते तसेच अपुऱ्या पायाभूत सुविधांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र इमारतींच्या पुनर्बांधणीऐवजी संपूर्ण परिसराचा एकात्मिक समूह पद्धतीने पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

KAMATHIPURA REDEVELOPMENT
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

३४ एकर क्षेत्रात ७३४ इमारती

सुमारे ३४ एकर क्षेत्रात, गल्ली क्रमांक १ ते १५ मध्ये हा पुनर्विकास प्रस्तावित आहे. प्रकल्पात सुमारे ४७५ उपकरप्राप्त आणि २५९ बिगर-उपकरप्राप्त अशा एकूण ७३४ इमारतींचा समावेश आहे. उपलब्ध प्रकल्प आराखड्यानुसार सुमारे ८,००१ निवासी व व्यावसायिक भाडेकरू/रहिवासी या प्रकल्पाशी संबंधित असून, त्यात सुमारे ६,६२५ निवासी आणि १,३७६ बिगरनिवासी भाडेकरू आहेत. याशिवाय सुमारे ८०० जमीनमालकांचाही प्रकल्पात समावेश आहे.

KAMATHIPURA REDEVELOPMENT
ठाण्यातील भाजपच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, 'त्या' कारणामुळे पक्षाला केला रामराम; राजकीय वर्तुळात खळबळ

पात्र रहिवाशांना ५०० चौ.फु. घरे

पुनर्विकासामध्ये विद्यमान पात्र रहिवासी आणि भाडेकरूंचे नियोजित पुनर्वसन करण्यात येणार आहे. पात्र निवासी भाडेकरूंना ५०० चौ.फु. क्षेत्रफळाच्या पुनर्वसन सदनिकांची तरतूद करण्यात आली आहे. व्यावसायिक गाळेधारकांच्या पुनर्वसनाचाही प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. या पुनर्विकासातून म्हाडासाठी सुमारे ४४,००० चौ.मी. गृहसाठा उपलब्ध होणार असून, त्यातून सुमारे ९०० अतिरिक्त गृहनिर्माण सदनिकांची निर्मिती प्रस्तावित आहे.

आधुनिक सुविधांसह पुनर्विकास

प्रस्तावित विकासात पुनर्वसन इमारतींसोबत निवासी आणि व्यावसायिक क्षेत्र, सार्वजनिक सुविधा, मनोरंजनासाठी खुल्या जागा, हरित क्षेत्र, अंतर्गत रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि आधुनिक नागरी पायाभूत सुविधांचा समावेश असेल. आधुनिक व भूकंपरोधक बांधकाम तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक वास्तुरचना, पावसाच्या पाण्याचे संधारण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, अग्निसुरक्षा व्यवस्था आणि लिफ्ट सुविधा यांचाही आराखड्यात समावेश आहे.

रहिवाशांना आगाऊ भाडे

पुनर्विकासाच्या काळात रहिवासी, व्यावसायिक गाळेधारक आणि जमीनमालकांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी १३ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले आहेत. रहिवाशांना दोन वर्षांचे आगाऊ भाडे तसेच पुढील एक वर्षाचे धनादेश देण्यास मान्यता देण्यात आली आहे. स्थलांतर व इतर अनुषंगिक खर्चासाठी एकवेळ २५ हजार देण्यात येणार आहेत. बिगरनिवासी गाळेधारकांसाठी क्षेत्रफळानुसार मासिक भाड्याची तरतूद करण्यात आली आहे. २०० चौ.फु.पर्यंत २५ हजार, २०० ते ४०० चौ.फु. क्षेत्रासाठी ३० हजार आणि ४०० चौ.फु.पेक्षा अधिक क्षेत्रासाठी ३५ हजार मासिक भाडे देण्यास मान्यता आहे. जमीनमालकांना पुनर्विकास कालावधीत प्रति प्लॉट २५ हजार मासिक भाडे देण्यात येणार आहे.

DCPR-2034 अंतर्गत प्रकल्प

कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्प DCPR-2034 मधील विनियम 33(9) अंतर्गत म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी म्हाडाला नोडल एजन्सी तसेच विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) म्हणून दर्जा देण्यात आला आहे. जून २०२५ मध्ये C&DA नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. शासनाने ६ एप्रिल २०२६ रोजी निविदा स्वीकारून संबंधित विकासकांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली. त्यानंतर ८ एप्रिल २०२६ रोजी अटी व शर्तींच्या अधीन राहून देकारपत्र देण्यात आले. ११ सप्टेंबर रोजी आयोजित नियोजित आराखडा सादरीकरण आणि जनसंवाद कार्यक्रमात स्थानिक नागरिक, भाडेकरू, जमीनमालक आणि विविध घटकांच्या प्रतिनिधींना प्रकल्पाची माहिती देण्यात आली होती. नागरिकांनी सूचना आणि प्रश्न मांडले असून, अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिली. C&DA करार पूर्ण झाल्याने कामाठीपुरा पुनर्विकासाने नियोजनातून प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्याकडे वाटचाल केली असून, दिवाळीत कामाचा श्रीगणेशा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com