कल्याण चेन स्नॅचिंग प्रकरणाचा उलगडा
५ महिन्यांनंतर तिघे आरोपी अटकेत
CCTVच्या मदतीने तपास यशस्वी
आरोपींकडून सोन्याची चेन जप्त
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
कल्याणमध्ये पाच महिन्यांपूर्वी झालेल्या चेन स्नॅचिंग प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पाच महिन्यांपूर्वी काही चोर रात्रीच्या सुमारास हॉटेल मालकाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळून गेले. याप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना मुंबईतून ताब्यात घेत अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी सी. जी. राजन हे कल्याण पश्चिम,रामबाग लेन नं. ४ येथील सॉल्टी नावाचे हॉटेल बंद करून घरी जात होते. इतक्यात तीन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे १० तोळे वजनाची ७ लाख रुपये किंमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तीन आरोपी मोटारसायकलवरून पळून जात असल्याचे आढळून आले. या आधारे पोलिसांनी त्यांचा माग काढत तपास मुंब्रा-ठाणेपर्यंत नेला. खबरींच्या मदतीने आरोपी मुंबईतील गोवंडी परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपायुक्त, परिमंडळ ३ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने मुंबईत जाऊन देवनार-गोवंडी परिसरातून दिलनवाज अंसारी, रिजवान खान आणि शाहरूख शेख यांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर, आरोपींना न्यायालयात हजर केले असता १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपासात आरोपींकडून ६ लाख ७६ हजार रुपये किंमतीची ५२ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महात्मा फुले चौक पोलीस करत असून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कल्याण डोंबिवलीत चोरीच्या घटना वाढीस लागल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.