

कल्याण-टिटवाळ्यातील अनधिकृत चाळींवर कारवाई सुरू
काँग्रेसकडून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
काँग्रेसने दिला आंदोलनाचा इशारा
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण टिटवाळा परिसरातील शासनाच्या जागांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत चाळींवर महापालिकेकडून कारवाई सुरू आहे. या प्रकरणामागील भूमाफिया, चाळ माफिया आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने जोरदारपणे लावून धरली आहे. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या संपूर्ण रॅकेटची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
टिटवाळ्यातील बनेली, वडवली, मोहणे, उभारणी आणि मांडा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत चाळी उभारल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या चाळींची जाहिरात करून सर्वसामान्य नागरिकांना ५ ते ६ लाख रुपयांत घर देण्याचे आमिष दाखवले जाते. अनेक कुटुंबे आयुष्याची कमाई खर्च करून ही घरे खरेदी करतात. मात्र काही काळानंतर महापालिका किंवा वन विभागाकडून या बांधकामांवर कारवाई केली जाते आणि त्यानंतर पुन्हा त्याच जागांवर नवीन अनधिकृत बांधकामे उभारली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
या भागात सुमारे १००० अनधिकृत चाळी उभारण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, या व्यवहारातून सुमारे ६००कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा गंभीर आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात विविध विभागांतील अधिकारी, स्थानिक राजकीय घटक आणि संबंधित यंत्रणांना आर्थिक लाभ मिळत असल्याचा आरोप करत काँग्रेसने निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नवीन सिंह यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले की, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून फक्त गरीब नागरिकांचे संसार उद्ध्वस्त केले जात आहेत. मात्र लोकांची फसवणूक करून कोट्यवधींचा व्यवसाय करणारे भूमाफिया, चाळ माफिया आणि संबंधित अधिकारी मोकाट फिरत आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसोबतच जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. या प्रकरणामुळे कल्याण टिटवाळा परिसरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.