
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीसाठी पाच वर्षांनंतर पुन्हा राजकीय रणधुमाळी
यंदा निवडणूक चार सदस्यीय पॅनल पद्धतीने होणार
ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी दोघांचे नेतृत्व करणारा मजबूत नेता अद्याप अदृश्य
भाजप आणि शिंदे गटाची मजबूत युती, त्यांच्यासमोर ठाकरे-मनसे युती टिकणार का, हे पाहणं महत्त्वाचं
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कालावधी हा ऑक्टोबर २०२० साली संपुष्टात आला. त्यानंतर कोरोनाच्या पादुर्भावामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तेव्हापासून पालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू आहे. या प्रशासकीय राजवटीला ५ वर्षांचा कालावधी पूर्ण होणार आहे. या प्रशासकीय राजवटीपासून कल्याणकरांची लवकरच सुटका होणार आहे. कारण महापालिका क्षेत्रात पुन्हा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील नागरिक आरोग्य सेवा,वैद्यकीय सेवा,रस्त्यांची दुरावस्था,अपुरा पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन,वाहतूक कोंडी, शहरातील वाढते प्रदूषण आणि पालिका क्षेत्रातीळ रखडलेल्या अवस्थेत असलेले बीएसयुपी प्रकल्प, स्मार्टसिटी अंतर्गत सुरू असलेले प्रकल्प आणि अनधिकृत बांधकाम आदी विविध समस्यांना सामोरे जात आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी पाहायला मिळतेय.
मागील कल्याण महापालिका निवडणूक ही २०१५ साली झाली. त्यावेळी तत्कालीन शिवसेना,भाजप ,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,मनसे,अपक्ष , एमआयएम,बसपा,२७ गाव संघर्ष समिती आदी पक्ष निवडणूक रिंगणात होते. त्या निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेचे ५३ उमेदवार जिंकले होते.
भाजपचे ४३ उमेदवार जिंकले होते. मनसे ९ तर मनसे पुरस्कृत १ असे एकूण मनसेचे १० उमेदवर जिंकले होते. काँग्रेसचे ४ उमेदवारांनी विजय मिळवला होता. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस २, एमआयएम १, बसपा १, अपक्ष ८ उमेदवार जिंकले होते.
२०१४ साली राज्यात भाजप-शिवसेना होती. त्यानंतर २०१९ साली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला सत्तेवरून पाय उतार केले. या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीची अडीच वर्ष सत्ता होती. पुढे शिवसेना फुटली.
शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून अनेक आमदारांसोबत भाजपशी हात मिळवणी करत सत्ता मिळवली. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेतही शिवसेनेत दोन गट पडून कार्यकर्ते विभागले गेलेत. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कल्याण-डोंबिवलीत पकड मजबूत आहे. शिवसेनेचे बहुतांशी माजी नगरसेवक हे शिंदे गटात गेले आहेत.
सध्या शिंदे गट-भाजपची राज्यात युती आहे. त्यातच आमदार रवींद्र चव्हाण आता भाजप प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे आता शिंदे गटाचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या दोघांची ठाणे जिल्ह्यावर पकड बसविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. पण यावेळी निवडणूक पहिल्यांदा पॅनल पद्धतीने असणार आहे.
कल्याण-डोंबिवलीतील मतदारांपासून ते राजकीय पक्षांना ही पद्धत नवीन असणार आहे. १२२ प्रभागासाठी घेतल्या जाणाऱ्या निवडणुका प्रथमच चार सदस्यीय पॅनल पद्धतीने घेतली जाणार असल्याने १ पॅनल ४ सदस्यांचे असे असणार आहे.
२९ पॅनल तर तीन सदस्याचे २ पॅनल असे एकूण ३१ पॅनलची निवडणुका घेतली जाणार आहे. या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ३१ पॅनलची प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर करून प्रकाशित केला होता. या प्रारूप प्रभाग आराखड्यावर इच्छुक उमेदवार आणि पक्षांनी हरकती घेतल्या आहेत. त्यावर नुकतीच सुनावणी पार पडली आहे. यात २७ गावांचा पालिकेत बाहेर काढा, अशी मागणी लावून धरली आहे. तर या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गट यांचे कार्यकर्ते सुखावले आहेत. पण या दोन्ही पक्षांचे नेतृत्व करेल, असा खमका नेता पालिकेत अद्याप तयार झालेला नाही, ही एक अडचण असल्याचे पाहायला मिळत आहे. तर नुकताच राज ठाकरे यांनी कल्याण दौरा केला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना जागृत होताना दिसली आहे, पण निवडणुकीत ती टिकून रहाणे गरजेचे आहे.
कल्याण-डोंबिवलीमधील बहुतांश माजी लोकप्रतिनिधी शिंदे सेनेत गेल्याने ठाकरे सेनेत कार्यकर्त्यांची वाणवा आहे. मनसे आणि उद्धव सेना एकत्र येऊन ही निवडणूक लढली, तर दोन्ही पक्ष कल्याण-डोंबिवली तारण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे येत्या निवडणुकीतच हे चित्र स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.