अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी
कल्याण : कल्याण जवळील मोहने परिसरात एका डॉक्टरचं संतापजनक कृत्य समोर आलं आहे. या डॉक्टरने एका अंध दाम्पत्याला तुम्हाला होणारे बाळ नको असेल तर ते आमच्या नातेवाईकाला द्या, ते तुमच्या हॉस्पिटलचा खर्च करतील. तुमच्या दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च करतील, असे आमिष अंध दाम्पत्याला दिले मात्र बाळ झाल्यानंतर हे बाळ या दाम्पत्याला न देता स्वतःच्या ताब्यात ठेवले.
या दाम्पत्याने विचारणा केली असता दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च तर नाकारलाच उलट त्या दाम्पत्याला रुग्णालयाचे बिल देत भरण्यास सांगितले. एवढेच नाही तर बाळाच्या आईचे दूध बंद होण्यासाठी अंध आईला गोळ्या देखील दिल्या. ही धक्कादायक घटना समोर येताच या प्रकरणी कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात डॉक्टर अनुदुर्ग धोनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, डॉक्टर अनुदुर्ग याने सर्व आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत. तर हे बाळ पुन्हा या अंध दाम्पत्याच्या ताब्यात देण्यात आले आहे .
डॉक्टरांना देवदूत म्हटले जाते, परंतु याच डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी घटना कल्याण जवळील मोहने येथे घडली. कल्याण ग्रामीण भागात राहणाऱ्या एका अंध दाम्पत्याला तीन वर्षाचा मुलगा आणि पाच वर्षाची मुलगी आहे. अंध महिला काही महिन्यापूर्वी मोहणे येथील गणपती नर्सिंग होम येथील डॉक्टरांकडे गेल्या. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पाच महिने गर्भधारणा झाल्याचे सांगितले.
मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या दाम्पत्याने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. या कुटुंबाने मोहने येथील गणपती नर्सिंग होम येथे गर्भपात करण्याकरता गेले. येथील डॉक्टर अनुदुर्ग धोनी यांनी सर्व तपासण्या केल्यानंतर बाळ नॉर्मल असून गर्भपात करु नका, होणारे बाळ हे आपण दत्तक देऊ, माझ्याकडे दत्तक घेणारे पालक आहेत. होणाऱ्या बाळाला मी माझ्याच नातेवाईकाला दत्तक देणार आहेत. त्या बदल्यात मी तुमच्या दोन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्च करील, असे सांगितले.
डॉक्टरच्या सल्ल्याने मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्याने आमिषाला बळी पडून या दाम्पत्याने मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. 23 ऑगस्ट रोजी या अंध महिलेची गणपती नर्सिंग होम येथे प्रसूती झाली तिने गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र या रुग्णलयाचे डॉक्टर अनुदुर्ग याने जन्माला आलेले बाळ दाम्पत्यांना न दाखवताच स्वतःच्याच ताब्यात ठेवलं. सात दिवसानंतर या अंध दांपत्याने डॉक्टरची भेट घेत ठरल्याप्रमाणे आपल्या दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची विनंती केली. परंतु डॉक्टर धोनीने स्पष्ट नकार देत दवाखान्याचे बिल भरण्यास सांगितले.
जवळपास आठ ते दहा दिवस डॉक्टरांने या बाळाला आपल्या ताब्यात ठेवले. आईच्या दूध बंद करण्यासाठी त्यांनी काही गोळ्या देखील दिल्या. मात्र एका सामाजिक कार्यकर्त्याच्या पाठपुराव्यानंतर डॉक्टराला ते बाळ आई-वडिलांना परत करावा लागले. याबाबत डॉक्टर अनुदुर्ग धोनी यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप सर्व खोटे असल्याचे सांगत आरोप फेटाळले.
मात्र या प्रकरणात कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी चाइल्ड वेल्फेअर समितीच्या एका अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डॉक्टरांनी जे कृत्य केले त्यानुसार त्या कायद्या अंतर्गत डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉक्टर अविरोधात कठोर कारवाई केली जाईल या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.