संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही प्रतिनिधी
कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरातील नागरिकांसाठी यंदाच्या दिवाळीत मेट्रोच्या रूपाने विकासाची मोठी भेट मिळाली आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका ५ च्या पुढील टप्प्यांसह मेट्रो मार्गिका ५ 'अ' च्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) वतीने ४ हजार ५६४ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
त्यामुळे या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या पुढील कामांना गती मिळणार असून, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरातील नागरिकांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे या मेट्रो मार्गिकांच्या उभारणीसाठी सातत्याने आग्रही होते. यासाठी त्यांनी वेळोवेळी एमएमआरडीए मुख्यालयात बैठका घेतल्या होत्या. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून मेट्रो मार्गिकांच्या उभारणीला वेग मिळाला आहे.
कल्याणमधील वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने होणारे नागरीकरण लक्षात घेता या भागात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची मोठी गरज आहे. मेट्रो ५ आणि ५ 'अ' च्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने कल्याण-उल्हासनगर-अंबरनाथ परिसराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे परिवर्तन घडण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
मेट्रो मार्गिका ५ चा विस्तार कल्याण आणि उल्हासनगरपर्यंत व्हावा, यासाठी खासदार शिंदेंनी शासन तसेच एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेतल्या. प्रकल्पाच्या मार्गरेखेत आवश्यक सुधारणा करणे, विविध प्रशासकीय मान्यता मिळवणे आणि अंमलबजावणीतील अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे सुधारित मार्गरेखेला राज्य शासनाची मान्यता मिळाली असून प्रत्यक्ष बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
कसे असेल मेट्रोचे जाळे आणि स्वरूप?
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका ५ च्या पहिल्या टप्प्यात कापूरबावडी ते धामणकर नाका या मार्गिकेचे काम सुरू आहे. या पुढील विस्तारामध्ये धामणकर नाका ते रांजणोली आणि पुढे रांजणोली ते भोईरवाडी (व्हाया दुर्गाडी) असा टप्पा असेल. भिवंडीमधील अरुंद आणि गर्दीचे रस्ते पाहता धामणकर नाका ते टेमघर हा मार्ग भुयारी (Underground) पद्धतीने उभारला जाणार असून उर्वरित मार्ग उन्नत (Elevated) असेल.
तर मेट्रो ५ 'अ' अंतर्गत भोईरवाडी ते कल्याण स्थानक आणि भोईरवाडी ते उल्हासनगर-अंबरनाथ (जीएनपी गॅलक्सी) अशा पद्धतीने विस्तारित भागाची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे थेट ठाण्याहून निघालेल्या प्रवाशाला कल्याण आणि उल्हासनगर येथे पोहोचणे सुलभ होणार आहे.
डबल डेकर मार्गिका अन् आधुनिक नियोजन:
या विस्तारित मार्गिकांच्या उभारणीत आधुनिक वाहतूक नियोजनाचा विचार करण्यात आला आहे. रांजणोली जंक्शन ते दुर्गाडी या परिसरात मेट्रो मार्गिकेसोबत उड्डाणपुलाची एकत्रित रचना असलेला 'डबल डेकर' मार्ग उभारण्याचे नियोजन आहे.
तसेच भिवंडीहून येणारी मेट्रो ५ ची डबल डेकर मार्गिका कोनगावपर्यंत येणार असून, कोनगाव येथून या मार्गिकेचा एक फाटा कल्याण एपीएमसीच्या (APMC) दिशेने जाईल. कोनगावपासून मेट्रो मार्गिका ५ चा विस्तार भोईरवाडीपर्यंत करण्यात येईल. भोईरवाडी येथून पुढे ही मार्गिका उल्हासनगरच्या प्रवेशद्वारापर्यंत (सध्या उन्नत रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणापर्यंत) जाईल. त्यानंतर जगदीश दूध डेपो परिसरापासून उल्हासनगरपर्यंत पुन्हा डबल डेकर मार्गिका उभारली जाईल. भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करता रस्ते आणि मेट्रो या दोन्ही सुविधा एकाच मार्गिकेतून विकसित होणार आहेत.
वाहतूक कोंडीतून सुटका आणि विकासाला गती:
सध्या भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरातील नागरिकांना कामानिमित्त ठाणे किंवा मुंबईत प्रवास करताना तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः कल्याणमधील दुर्गाडी, खडकपाडा, भोईरवाडी तसेच उल्हासनगर परिसरातील रस्त्यांवरील वाहनांचा भार पाहता ही विस्तारित मार्गिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर रस्त्यांवरील खाजगी वाहनांची संख्या कमी होण्यास मदत होईल आणि नागरिकांचा प्रवास अधिक वेगाने पार पडेल. त्याचबरोबर मध्य रेल्वे, मेट्रो मार्गिका ४ आणि प्रस्तावित मेट्रो मार्गिका १२ यांच्याशी जोडणी (Connectivity) अधिक सक्षम होऊन संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) दळणवळण व्यवस्थेला बळकटी मिळेल. या मेट्रो प्रकल्पामुळे परिसरातील औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी क्षेत्रांनाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.