संजय गडदे, साम टीव्ही
मुंबई: जोगेश्वरी पोलिसांच्या सतर्कता, तत्परता आणि संवेदनशीलतेमुळे स्वतःचे नाव व पत्ता सांगू न शकणाऱ्या एका ८ वर्षीय विशेष बालकाला अवघ्या दीड तासांत त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जोगेश्वरी पोलिसांचे कौतुक होत आहे. ३० जुलै रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता जोगेश्वरी (पूर्व) येथील सुभाष रोडवरील येवले चहा दुकानासमोर गस्त घालत असताना पोलीस नाईक जगन्नाथ मिसाळ यांना एक लहान मुलगा एकटाच रडत असल्याचे दिसून आले. मुलगा विशेष बालक असल्याने त्याला स्वतःचे नाव किंवा पत्ता सांगता येत नव्हता. तो केवळ "अब्बा" आणि "अम्मा" एवढेच शब्द उच्चारत होता.
पोलीस नाईक मिसाळ यांनी मुलाच्या टी-शर्टवर 'बृहन्मुंबई महानगरपालिका हिंदी शाळा' असा उल्लेख पाहून तातडीने संबंधित शाळेशी संपर्क साधला. शाळेतील शिक्षक लक्ष कुमार नंदेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मुलगा 'सोपान स्पेशल इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये शिकत असल्याचे समजले. यानंतर सोपान स्पेशल इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका श्रीमती नेहा तेंडुलकर यांनी मुलाची ओळख पटवून त्याचे नाव मोहम्मद शहबाज अन्सारी असून त्याचे वडील रियाज अहमद अकबर अली अन्सारी असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर जोगेश्वरी पोलिसांनी तात्काळ पालकांशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले. आवश्यक खातरजमा पूर्ण केल्यानंतर मुलाला सुखरूप त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उप आयुक्त दत्ता नलावडे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र राणे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक इक्बाल शिकलगार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस नाईक जगन्नाथ मिसाळ यांच्या तत्परतेमुळे एका कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या या संवेदनशील आणि कौतुकास्पद कामगिरीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.